महाराष्ट्रभर गीतेवर प्रवचने देत हिंडावे, बृहन्महाराष्ट्रभर हिंडावे, प्रवचनाच्या शेवटच्या दिवशी माझ्या या प्रांतभारतीच्या स्वप्नासाठी मदत मागावी असे मनात येत आहे. महाराष्ट्रभर मजविषयी प्रेमस्नेह बाळगणारे अनेक मित्र आहेत. त्यांना माझ्या ह्या ध्येयपूर्तीसाठी मला नाही का मदत देता येणार? मी सार्‍या  महाराष्ट्रासमोर माझे चिमुकले हात पसरीत आहे. हे स्वप्न पूर्ण करायला द्याल का मदत? महाराष्ट्राला भूषणभूत ही संस्था होवो. भारतीय ऐक्याचे थोर ध्येय शिकवणारी प्रांतभारती प्रियतम महाराष्ट्रात उभी राहो.

पुण्याला मराठी साहित्यसंमेलन आहे. प्रांतभारतीच्या माझ्या स्वप्नाला पाठिंबा द्या. अशी कदाचित् मी तेथे जाऊन सर्वांना प्रार्थना करीन. परंतु माझी संकोची वृत्ती. तेथे जाऊन बोलण्याचे मला धैर्य होईल की नाही प्रभू जाणे.

तुकारामांनी म्हटले आहे. 'मेली लाज धीट केलो देवा.' माझी भीती, खोटी लाजलज्जा जाऊन या स्वप्नाच्या पूर्तीसाठी नम्रपणे निर्भयपणे साहित्य संमेलनातील सज्जनांसमोर येऊन मी सहानुभूती भिक्षा मागितली तर मला हसू नका, उपहासू नका. भारतीय ऐक्याच्या साक्षात्कारासाठी तहानलेले महाराष्ट्राचे मी एक धडपडणारे लेकरू आहे. या लेकराची आळी थोरामोठयांनी पुरवावी.

'केली पुरवी आळी
नव्हे निष्ठुर कोवळी।'


महाराष्ट्रीय जनता निष्ठूर न होता, कोवळया वृत्तीने एका मुलाचा ध्येयार्थी हट्ट, हे स्वप्न, ही असोशी पुरवील अशी मला आशा आहे.

प्रांतभारतीच्या मूर्तस्वरूपासाठी धडपडण्याचे अतःपर मी ठरवीत आहे. हा संकल्प पार पाडायला प्रभू मला शक्ती देवो. सत्य संकल्पाचा तोच एक दाता!

प्रचंड इमारत जेव्हा उभारण्यात येते तेव्हा आपल्याला काय दिसते? गवंडी दगडांना इकडे तिकडे काटीत छाटीत असतो. मगच दगडांना त्या भव्य इमारतीत जागा मिळते. ज्याप्रमाणे दगड-विटा सारख्या करून त्यांची पुढे आलेली टोके काटून छाटून घ्यावी लागतात, त्याचप्रमाणे दगडा-दगडांमध्ये, विटा-विटामध्ये सिमेंटही लागले; चुना लागतो. प्राचीन इमारती अजून भक्कम आढळतात. म्हणतात की, चुन्यात गूळही घालीत असत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel