गोकुळांत प्रेमाचा पाऊस पडत होता. ''यारे यारे अवघेजण'' अशी भगवंतांची हाक होती. तेथे भेदाभेदांची भुते नव्हती. वणवे भेदाचे श्रीकृष्णाने गिळून टाकले होते. नवीन पिढीच्या सर्व मुलांना त्याने एकत्र जेवायला बसवले. सर्वांच्या शिदोर्‍या एकत्र मिसळून काला केला. त्याने अलग पंक्ति नाही बसवल्या. याचा पाट असा, त्याचा तिरका, असला चावटपणा गोकुळात नव्हता. तेथे पेंद्याची भाकरी नी श्रीमंताकडची पोळी एकत्र मिसळण्यात आली होती. तो गोकुळातील काला आठवा. आकाशातील देवांना त्याचा हेवा वाटला.

आपापल्या बंगल्यात बसून अमृत ओरपून ते कंटाळले होते. ते वैभवाला, एकांडे शिलेदारपणाला कंटाळले. ते यमुनेच्या पाण्यातील मासे बनले. गोपालकृष्णाच्या हातचे शितकण यमुनेच्या पाण्यात पडत. ते मटकावून ते कृतार्थ होत. त्या एकेका कणात प्रेमाचा सागर होता. मधुरतेचा सिंधू होता. सर्वासह एकत्र जेवणारा कोठे तो गोपाळकृष्ण आणि अमक्यातमक्याकडे जेवला म्हणून बहिष्कार घालणारे आपण करंटे कोठे! कशाला रामकृष्णाची आपण नावे घ्यावीत? कशाला ती पवित्र मानता? मुलांबाळांना ठेवता?

तो प्रभूरामचंद्र गुह कोळयाला हृदयाशी धरी. शबरीची उष्टी बोरे खाई. जटायू पक्ष्याचे श्राध्द करी. वानरांना, अस्वलांना जवळ घेई. आपण रामजन्म करतो. गोकुळअष्टमीस कृष्णजन्म करतो, परंतु देव जन्मताच मरतो. आज भारत वर्षात देव नाही. जेथे भाऊ भावाची उपेक्षा करीत आहे, भाऊ भावाला शिवू नको म्हणत आहे, भाऊ भावाला जवळ घेत नाही, प्रेमाने कवळा देत नाही, पाणी देत नाही, तेथे कोठला धर्म?

आणि शंकराची मूर्ती म्हणजे मला जणू अंत्यजाची मूर्ती वाटते. त्यांच्या नेसू कातडे, हातात कपालपात्र, हाडाचे भांडे, अंगाला धूळ, रक्षा. कोणाचे आहे हे रूप? कोणाची मूर्ती म्हणून महिम्न स्तोत्रात म्हटले आहे की देवा अमंगल स्वरूपातच मांगल्य आहे. महिम्न स्तोत्र रचणार्‍याला ते दिसले, परंतु तुम्हा आम्हाला दिसले नाही. हरिजनांचा, सेवा करणार्‍याचा महिमा कळला नाही.

आणि दत्ताची मूर्ती बघा! बरोबर कुत्री आहेत. कधी भणंग वेषाने हिंडत आहेत, त्यातील भावार्थ लक्षात घ्या. देव सर्वत्र आहे. सर्व स्वरूपात आहे. तो बघा. माणसाला दूर नका करू, परंतु आपण सारे माणूसघाणे झालो.

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची भक्ती मनात असेल तर जातीव्यक्तिच्या नावाने शून्य करा- ''तेथ जाति व्यक्ति पडे बिंदुले.'' परंतु देवासमोरही आपण जातींचे अहंकार मिरवतो. मुंबईहून मुलगा सुटाबुटात घरी यावा व एकदम आईला भेटायला जावा. आई म्हणेल, ''तुझे खोगीर उतरून ये. तो जामानिमा ओटीवर काढून आत ये.'' त्याप्रमाणे ती जगन्माता म्हणेल, ''अरे मी ब्राह्मण, मी मराठ। मी साळी, मी माळी हे बिल्ले छातीवर लावून माझ्याकडे नका येऊ. सारे विसरून या.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel