कम्युनिस्टांच्या राष्ट्रद्रोही संकटांमुळे सरकार नवे कायदे करीत आहेत. नवीन सत्ता हाती घेत आहे. त्या कायद्यांचा निर्मळ मार्गाने जाणार्‍यांसही उद्या कदाचित त्रास व्हायचा. गुंडकायदा मग सरकारला जो जो गुंड वाटतो त्यांना लागतो. मग भले कार्यकर्तेही तुरुंगात लोटले जातात. श्री. जयप्रकाश मागे म्हणाले की. 'असे कायदे करून प्रश्न सुटत नसतात. रेल्वे वगैरेसारख्या राष्ट्रव्यापी धंद्यांतील प्रश्न सोडवण्यासाठी स्पेशल मशिनरी-एखादे कायमचे मंडळ निर्मा. त्यात सरकारचे, कामगारांचे प्रतिनिधी घ्या.' परंतु कोण ऐकतो? असो. सरकारच्या आजच्या धोरणामुळे  अडचणी आल्या तरी समाजवादी पक्षाने धीरगंभीरपणे जात राहावे. ओल्याबरोबर सुके जळते. कम्युनिस्टांबरोबरच कदाचित् समाजवाद्यांचीही थोडीबहुत लांडगेतोड व्हायची. संघाला बंदी झाली नि सेवा करणार्‍या  थोर सेवादलासही निमबंदी. परंतु अधीर नि आततायी न होता, ज्वलंत श्रध्दा न गमावता समाजवाद्यांनी संघटना करीत राहावे. विचारप्रसार करीत राहावे. लोकांना सुशिक्षित करीत राहावे. आलीच वेळ तर संपासही त्यांनी उभे राहावे. बोलणीही करावीत. हट्टास शक्यतो पेटू नये. संप पुकारावा लागलाच तर तोही शांतपणे, सत्याग्रही मार्गाने चालवावा. तेथे आगलावेपणा नको. मोडतोड नको. अशी भारताची नीती असू दे. या मार्गाने ध्येयाकडे जाऊ या. महात्माजींनी सार्‍या  जगाला जरा उंच पातळीवर नेले. त्यांच्या जन्मभूमीत तरी शिसारी आणणारे, आगलावे कम्युनिस्टी प्रकार नकोत.

पुणे, चाळिसगाव, सोलापूर या शहरांत कामगारांचा सत्याग्रह चालू आहे. पुण्यात सत्याग्रह ५ तारखेपासून सुरू झाला. परंतु चाळिसगावची दुःखकथा आज चार महिन्यापासूनची आहे. ११ मेला तेथील गिरणी बंद झाली. कामगारांनी शेवटचा उपाय म्हणून सत्याग्रह सुरू केला, तेव्हा गिरणी उघडली; परंतु कामगारांना स्टँडर्डचा काही भाग हातखर्चासाठी म्हणून देऊ असे कबूल करूनही फसविण्यात आले. नाथा ताम्हणे यांनी उपवास सुरू केला. १५ दिवस उपवास झाला. तो इकडे पुन्हा मालकांनी गिरणी बंद केली तेव्हा पुन्हा मूळपदावरच प्रश्न आला. त्यांनी उपवास सोडला. चाळिसगावचे कामगार आणि त्यांची मुलेबाळे यांनी काय खावे? मालकांचा खेळ होत आहे; सरकारची त्याला साथ. चाळिसगावला इंटकचे मूळ धोरण. तेथील समाजवादी कामगार संघटना मोडून काढण्याचे का हे किळसवाणे कारस्थान आहे? गिरणी बंद करून कामगार शरण येतील अशी मालकांची अपेक्षा. परंतु कामगार सत्याग्रहावर गेले. तेव्हा मिल तात्पुरती उघडून पुन्हा अटी मोडून चावटपणा सुरू झाला, पुन्हा मिल बंद. कामगार तेथे सत्याग्रह करीत आहेत. सत्याग्रहींना दोरखंड बांधून नेण्यांत आले असे कळते. सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या. आधीच चार-चार महिने मिल बंद म्हणून घरात उपासमार. आता सत्याग्रही चार-चार महिने तुरुंगात पाठविले, तर घरी काय दशा असेल? किती दिवश कामगार सत्याग्रह करणार? फार तर काय, चार आठ-दिवस करतील. पुढे काय? मालक बेफिकीर आहेत. उद्या नियंत्रणे उठली, म्हणजे बेटे पुन्हा एका महिन्यात गिरणी बंद असलेल्या काळातील तूट भरून काढतील. मालक म्हणतात, 'आमच्या जवळ पैसा नाही. माल साठला आहे.' जो माल खपणार नाही तो का काढलात? तुम्हाला अक्कल नव्हती? सरदार वल्लभभाई पटेल चरखा संघाला पाठविलेल्या संदेशात म्हणतात, 'देशात कापडाची टंचाई आहे. चरखा संघाला साथ देऊन लोकांनी ही टंचाई दूर करावी.' इकडे कापडाची टंचाई तर इकडे गिरण्यांतून साठे साठलेले! कापडाच्या भरमसाट किंमती, वाटेल तो माल काढलेला, असा हा भांडवलदारीचा चावटपणा आहे. पाकिस्तानने यांचा कपडा नको म्हटले. तुमचे महाग कापड कोण घेणार? हे गिरणी मालक देशद्रोही आहेत. पंरतु डॉ. श्यामप्रसाद त्यांना मिठया मारीत आहेत. देशातील ४० गिरण्या बंद पडल्या, त्याचे त्यांना काहीच नाही. ४०० मधील ४० बंद पडणे ही बाब त्यांना मामुली वाटली. याचा अर्थ ३० कोटीतील ३ कोटी लोक गेले तरी त्यांना मामुली बाबच वाटेल!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel