जैन हे अहिंसा धर्माचे उपासक. स्याद्वादाचा त्यांचा सिध्दांत. 'इदमपिस्यात्' हेही असू शकेल असे ते म्हणत. स्वतःचे मत मांडताना, त्याची सत्यता स्थापताना दुसरीही बाजू असू शकते अशी अनाग्रही वृत्ती स्याद्वादात आहे. स्याद्वद म्हणजे संशयात्मा नव्हे. मला या क्षणी जे सत्य वाटते ते मी घेऊन जावे. परंतु त्याला विरोध करणार्यांची मी चटणी नाही उडवता कामा. कारण कदाचित् उद्या माझे हे सत्यही चुकीचे ठरेल. अशी वृत्ती जर समाजात राहील तर समाजात अहिंसा राहील. हिंदुस्थानात नाना दर्शने , नाना तत्वज्ञाने जन्मली, परंतु कोणी कोणाला छळले नाही, जाळले-पोळले नाही. चार्वाकवादी आपले मत मांडीत आहेत, अद्वैती आपले तत्त्वज्ञान मांडीत आहेत. आपापली मते मांडा. जनतेला पटेल ते जनता घेईल. अशानेच सत्याची पूजा होईल. सत्य का तरवारीने शिकवायचे असते, जेथे संकुचितपणा असेल तेथून सत्य निघून जाते. अहंकाराजवळ कोठले सत्य? महात्माजी नेहमी म्हणत, ''मला पटवा. माझी चूक दिसली तर मी निराळा मार्ग घेईन.'' ते स्वतःच्या श्रध्देने जात होते. ती श्रध्दा अचल होती, परंतु सदैव नवीन घ्यायला ते सिध्द असत.
कृष्णमूर्ती एकदा म्हणाले, ''Truth can never be organised.'' सत्याची संघटना नाही करिता येत. विनोबाजी हेच म्हणाले होते. तुरुंगातून सुटून आल्यावर ते महात्माजींना म्हणाले, ''मला कोठे अध्यक्ष, चिटणीस नका नेमू. हे घ्या राजीनामे.'' महात्माजींनी विचारले, ''परन्तु काम करणार आहेस ना?'' ते म्हणाले, ''हो.'' महात्माजी म्हणाले, ''मग दे तुझे राजीनामे.'' संघटना बांधली की थोडा तर अभिनिवेश येतोच. माझाच पक्ष खरा, माझी संघटना सत्यावर उभी असे मला वाटते. सत्य तर सूर्यप्रकाशाप्रमाणे मोकळे हवे, वार्या प्रमाणे सर्वगामी हवे. तरच ते सतेज, निर्मळ, प्राणमय राहील. पंडित जवाहरलाल संघटना करू शकणार नाहीत. कारण संकुचितपणा त्यांच्या वृत्तीस मानवणार नाही. अहंकार मानवणार नाही. ते एखादे वेळेस रागाने बोलले तरी पुन्हा चुकलो म्हणतात. मुत्सद्याच्या ठिकाणी असा दैवी गुण भाग्यानेच आढळतो. परंतु गांधीजींनी या राष्ट्राला, जगाला दिलेली ती शिकवण आहे. लंडन कराराच्या बाबतीत परवा बोलताना नेहरू 'समाजवादी प्रतिगामी आहेत' वगैरे बोलले. परंतु मागून ते शब्द त्यांना परत घेतले. आपल्या निर्णयाची सत्यता स्वतःला पटत असूनही दुसर्या विषयी सदभाव ठेवणे ही अहिंसा; यातच लोकशाहीचा आत्मा. महात्माजींनी आमरण ही गोष्ट कृतीने शिकविली. भारतीय संस्कृतीतच ही गोष्ट आहे. विनोबाजी हेच सांगत असतात.
संघटनेमुळे, पक्षामुळे अंधता येते, जडता येते; म्हणजे मीच खरा ही वृत्ती येते, अभिनिवेश येतो, सत्य गुदमरते हे सारे खरे. परंतु जगात कार्य करायचे तर काही संघटना तर लागते. विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात, ''जगात कार्य करायचे तर थोडा अहंकारही लागतो.'' परन्तु थोडा अहंकार म्हणजे अहंकाराचा कुंज नव्हे. लोकमान्य एकदा म्हणाले म्हणतात की, ''खोटे बोलून स्वराज्य येणार असेल तर मी खोटेही बोलेन.'' यातील 'ही' शब्द महत्त्वाचा आहे. आता अगदी माझ्या खोटे न बोलण्यामुळेच अडत असेल तर बोलतो बाबा. म्हणजे ती 'ही' दुःखच दाखविते. खोटे बोलणे वाईटच, परंतु आलीच वेळ तर तेही करीन; परंतु लोक 'ही' विसरून गेले, आणि म्हणू लागले लोकमान्य म्हणत की, स्वराज्यासाठी खोटे बोलले म्हणून काय झाले? राजकारणात हे चालायचेच, असा अर्थ करू लागले. विवेकानंदांच्या वरील म्हणण्याचाही असा अर्थ कोणी करतील; परंतु विवेकानंद 'थोडा अहंकार' म्हणतात. आपापले पक्ष करा, संघटना करा. आपण बरोबर आहोत ही श्रध्दा ठेवून, हा थोडा अहंकार ठेवून काम करा, परंतु अहंकार फाजील झाला की दुसर्या पक्षांचे निःसंतान करायला निघाल. म्हणून जपा. गांधीजीनींही संघटनेचा आश्रय करूनच प्रयोग केले. काँग्रेस संघटनेद्वारा त्यांनी काम केले. इतरही अनेक संस्था त्यांनी काढल्या, परंतु त्यांची स्वतःची विशिष्ट श्रध्दा असूनही ते मोकळे असत. बॅ. जिनांकडे पुनः पुन्हा बोलणी करायला जात. 'मला पटवा' म्हणत कम्युनिस्ट, सोशलिस्ट, सर्वास ते असेच सांगत.
आपण मानव अपूर्ण आहोत. ज्याप्रमाणे संपूर्ण सत्य आपणास मिळणे कठीण, त्याचप्रमाणे मिळालेल्या श्रध्देनुसार अहंकाररहित होऊन जाणेही कठीण. परंतु प्रयत्न करावा, त्या दिशेने जावे. आपापल्या विचारांचा, कल्पनांचा प्रचार करा, त्या पटवा, परंतु हाणामारीवर येऊ नका. सत्याला हाणामारीची, तुमच्या शस्त्रास्त्रांची जरूर नाही. ते प्राण मय असेल तर जगात विजयी होईल. सत्य जर सत्तेवर अवलंबून असेल, आत्मा ऍटमबॉम्बवर अवलंबून असेल, तर सत्ता व ऍटमबॉम्ब, म्हणजेच विश्वाचे आदि तत्त्व वा अंतिम असे म्हणावे लागेल आणि तसे असेल तर जीवनाला आशा तरी कोणती?