महाराष्ट्राचे चार पाच भाग पाडून त्यांचा एक महाराष्ट्र संघ बनवणार? नागपूरचे जिल्हे, विदर्भ, महाराष्ट्र, कोकण असे का भाग पाडणार? असे करणार तर महाराष्ट्राचे पंचप्राण पाच ठिकाणी का एकजिनसी महाराष्ट्र बनणार ? सारा बृहन्महाराष्ट्र एक करा. त्यात आणखी पुन्हा छकले नकोत. त्या त्या भागांना आणखी पुन्हा स्वायत्तता पाहिजे असेल तर त्याला अर्थ काय आहे? जर असे भाग राहणार असतील तर मुंबईही मग तशीच राहू दे असे काही मुंबईकर म्हणतील. म्हणून एक गोष्ट निश्चित ठरवली पाहिजे की, नागपूर ते कारवार हा सलग भाग एक घटक म्हणून राहील. मराठवाडाही महाराष्ट्राचे माहेर. तोही पुढे येईल. या सलग एकजिनसी महाराष्ट्रातच तो सामील व्हायला हवा. कोकणी भाषेचा सवता प्रदेश - असल्या विचारांना अर्थ नाही. मग खानदेशातील अहिराणी भाषेचा का नको?
सीमेवरच्या काही प्रदेशाबाबत मतभेद होणे शक्य आहे, परंतु सीमासमिती नेमून तिच्या द्वारा सर्व प्रश्न सोडवून घ्यावेत. थोडा भाग इकडे का तिकडे अशी भाऊबंदकी वाढवू नये. शेवटी भारताचेच ना? बेळगावचा प्रश्न, कारवारचा प्रश्न, असे अनेक प्रश्न येतील. बेळगाव म्युनिसिपालिटीने मागे ठराव केली की, आम्हांला महाराष्ट्रात अंतर्भूत करा. कारवारातील काही भागात मराठी, काही भागात कानडी आहे. दोन्ही भाषा पुष्कळांना समजतात. हे प्रश्न विकोपास जाऊ देऊ नका. कोठे तरी शेवटचे न्यायमंदिर आपण मानले पाहिजे. तेथील निर्णय मानायला हवा.
सर्वात कठीण प्रश्न मुंबईचा आहे. मुंबई महाराष्ट्रात असावी की नसावी हा प्रश्न का निघाला, समजत नाही. मुंबईच्या सभोवती महाराष्ट्र आहे. मुंबई कोठे जाणार? मुंबईला पाणी महाराष्ट्रातून मिळते, मुंबईला वीज महाराष्ट्रातून मिळते. मुंबईला काम करायला कामगार महाराष्ट्र देतो, हिशोब ठेवायला महाराष्ट्र येतो. गरीब परंतु हृदयाने श्रीमंत आशा महाराष्ट्राची मुंबई आहे. मुंबईच्या धनसंपन्न लोकांचा असा दावा आहे की, आम्ही मुंबईचे वैभव वाढविले. आम्ही मरिन लाइनला राजवाडे उभारले, मलबार हिलवर बंगले बांधले. या गिरण्या, हे कारखाने आमचे. या धनाढयांना एवढेच सांगणे की सारी संपत्ती श्रमांतून निर्माण होत असते. श्रमणारांच्या कष्टांतून ते वैभव फुलले आहे. तुम्हांला खोलीत कोंडले तर का पैसा निर्माण कराल? शेतकरी धान्य पिकवतो, तुम्ही विकता व कुबेर होता. गिरणीतील कामगार कापड विणतो, तुम्ही विकता न कोटयधीश होता आणि पुन्हा त्या संपत्तीच्या जोरावर तोरा मिरवता? हे न्याय्य नाही, माणुसकीला शोभणारे नाही.
धनाढयांनो, तुम्ही कोणीही असा, तुम्हांला भीती नको. महाराष्ट्रातील खेडयापाडयात मारवाडी, गुर्जर शेकडो वर्षे दुकाने थाटून बसले आहेत. आम्ही त्यांना कधी परके नाही मानले, तुम्हांला मुंबईत परके नको वाटायला, जरी ती महारष्ट्रात गेली तरी महाराष्ट्र दिलदार आहे.