Bookstruck

सर्वोद्य व अनाग्रही निष्ठा 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

देशात लोकशाहीचे तत्त्वज्ञान तेव्हाच दृढमूल होईल, जेव्हा आपण आपापल्या मतांचा अति अभिनिवेश बाळगणार नाही. याचा अर्थ आपल्या मताविषयी आपणासच श्रध्दा नको असा नाही. परंतु सत्य समजणे कठीण आहे. मी माझ्या श्रध्देप्रमाणे जावे, परंतु तोच एक सत्याचा मार्ग असे मी कसे म्हणू? कदाचित उद्या माझीही चूक मला कळेल, आणि मी निराळा मार्ग घेईन. म्हणून मी माझे मन मोकळे ठेवायला हवे. नवीन प्रकाश घ्यायला सदैव ते तयार असायला हवे. ''बुध्देः फलमनाग्रह'' असे वचन आहे. तुमच्याजवळही बुध्दि आहे, विचार करायची शक्ती आहे हे कशावरून ठरवावयाचे? तुम्ही आग्रही नसाल, हट्टी नसाल तर. सत्याचा संपूर्ण ठेवा जणू आपणासच सापडला अशी भावना विचारी मनुष्य कधी करू शकणार नाही. तो आपल्या श्रध्देप्रमाणे जाईल, परंतु त्या श्रध्देप्रमाणे न जाणार्‍यांचा तो खून करणार नाही. त्यांच्या आत्यंतिक द्वेष तो करणार नाही. त्यांचे करणे आज तरी मला चुकीचे वाटते असे फारतर तो म्हणेल.

गांधीजींसारख्यांची या देशात हत्या झाली, याचे कारण काय? आपण सर्वांनी या घटनेचा गंभीर विचार केला असेलच. मताचा अभिनिवेश हाच या गोष्टीच्या मुळाशी नाही का? मला वाटते तेच सत्य, बाकीचे सारे चूक, एवढेच नव्हे तर राष्ट्राला ते खड्डयात लोटीत आहेत म्हणून त्यांना दूर केले पाहिजे. ही स्वतःच्या मताची आत्यंतिक आग्रही वृत्तीच या खुनाला प्रवृत्त करती झाली. कम्युनिस्ट आज कित्यके महिने तेलंगणात निःशंकपणे खून पाडीत आहेत. ही जनतेची चळवळ आहे. मग खून पाडले म्हणून काय झाले असे त्यांचे लोक म्हणतात. ब्रह्मदेशातही जनतेची (म्हणजे स्वतःच्या पक्षाची) न्यायासने नेमून ते अनेकांचा शिरच्छेद करीत आहेत असे कळते. कम्युनिस्टांचे आजकालचे तत्त्वज्ञान 'आम्हीच अचूक' या समजुतीवर उभारलेले आहे. रशियांतील स्टॅलिनची कारकीर्द रक्ताने माखलेली आहे. जो जो विरोधी तो तो दूर केला गेला. अपार छळ त्यांचे झाले. नाझी लोकच क्रूर होते असे नाही. रशियातील तुरुंगातूनही जे लाखो जीव संशयावरूनही ठेवले जातात त्यांचेही कसे भीषण हाल केले जातात, ते ज्यांना शक्य झाले त्यांनी स्वानुभवाने लिहिले आहे. पूर्वी ख्रिस्ती लोकही धर्माचा असाच प्रचार करीत. प्रत्यक्ष ख्रिस्ती धर्मातही कॅथॉलिक किंवा प्रॉटेस्टंट यांनी एकमेकांचा का कमी छळ केला? मुसलमानी धर्माचा काही प्रचार ''कुराणातच सारे सत्य आहे. ते माना, नाहीतर मान उडवतो.'' या अभिनिवेशानेच झालेला आहे. असे हे जुलूम का केले जातात? मनुष्य इतका कठोर, निर्दय कसा होतो? माझ्याजवळचे सारे सत्य आहे. बाकी सारे चूक, या वृत्तीतून अखेर अहंकार बळावतो. मनुष्य आंधळा होतो. माझ्याजवळ जे आहे तेच सत्य असल्यामुळे त्याच्या आड जो जो येईल तो तो उडवलाच पाहिजे, ही आसुरी वृत्ती जन्मते. माझ्या सत्याला विरोध करायला कोणी उभा राहता कामा नये, यासाठी या सर्वांना दहशत बसावी असे मला वाटते. नाझी लोकांना वाटे, ''जर्मन वंशच श्रेष्ठ; बाकीचे मानव म्हणजे केरकचरा. त्यांना जाळले काय, छळले काय, काय बिघडले?'' कम्युनिस्टांना वाटते, ''आम्हीच जगाते उध्दारकर्ते. दुसर्‍या जवळ सत्य नाही. आमचा मार्ग म्हणजे मानवी सुखांचा, विकासाचा. त्या मार्गात जे जे आड येतील ते ते वाटेल त्या रीतीने नष्ट करणे हेच योग्य.'' अशा वृत्तीमुळे कम्युनिस्टी छळबुध्दी आणि खुनी वृत्ती जन्मली. संघाच्या लोकांना असेच वाटे आणि अखेर महात्माजींचा वधही अशाच प्रवृत्तीतून झाला. एकदा 'मी खरा' हा अहंकार जडला की त्याच्यामागून अंधता, निर्दयता, सारे काही येते.

« PreviousChapter ListNext »