उपप्रांताचे तुणतुणे का बरे वाजविण्यात येते? आपापल्या छोट्या प्रदेशातील आपली मिरासदारी दूर होईल असे का काहींना वाटते? ज्याप्रमाणे पूर्वी नोकर्या चाकर्यांकरिता आपापल्या संकुचित संघटना उभारित त्यातलाच का हाही एक प्रकार? उपप्रांताचा सूर काढून संयुक्त महाराष्ट्रा विचका करू नका. संयुक्त महाराष्ट्रात प्राण ओतीत असतानाच त्याचे दुसरीकडे हातपाय तोडून ठेवू नका.
खरे म्हणजे माझी वृत्ती भारतीय आहे. एका भारताची मूर्ती मनासमोर येऊन मी उचंबळतो. माझ्या मनात कोणता भाग कोठे असला पाहिजे हे फारसे येत नाही. परंतु जनतेच्या न्याय्य भावना असतात. राष्ट्रभाषा असली तरी त्या त्या प्रांतांतील जनता तेथील भाषेवर पुष्ट होणार. प्रांतीय मातृभाषेतूनच विचाराचे दूध मिळणार. म्हणून भाषावार प्रांत रचनेची आवश्यकता. मुंबई कोठे असावी, अमुक भाग कोठे असावा याची चर्चा मला दुःखद होते. परंतु जेव्हा न्यायाची भाषा बोलली जाते, तेव्हा न्याय नीट मिळायला हवा. व्यापाराचे निमित्त करून मुंबई हिरावू पहाल तर पैसा हे तुमचे दैवत ठरेल, आणि श्रमणार्यांना कस्पटासमान लेखता असे म्हणावे लागेल. मुंबई न दिली तर महाविदर्भही यायला तयार नाही हे माहीत असूनही मुंबई न देणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडेच ठेवणे तुमचे ध्येय आहे असे दिसते. महारष्ट्राची शक्ती खच्ची करून ठेवण्यातच काँग्रेस श्रेष्ठींना पुरुषार्थ वाटतो का?
मला असे का वाटते? त्याचे कारण असे. माझा प्यारा महान भारत मी हिंडून कधी पाहू? मुंबई म्हणजे भारताची पूंजीभूत मूर्ती. येथे महाराष्ट्रीय, गुजराती, पारशी, मारवाडी, आहेतच. येथे दूध वाटणारे भैये आहेत, आणि सिंधू नदीचे सिंधी बंधू आले आहेत. येथे माटुंगा बाजूला मद्रासी बंधू व पाण्याचे नारळ विकणारे मोपला आहेत. येथे मलबारी, तामिळी, तेलगू सारे आहेत. येथे समुद्र उचंबळत आहे, त्याप्रमाणे मानव-सागरही उसळत आहे. त्या त्या प्रांतीय जनतेच्या लाटा येथील महान मानव सिंधूत नाचत आहेत, खेळत आहेत. मुंबई पाहून भारत पाहिल्याचे श्रेय मिळते. हिंदू, मुसलमान, शीख, पारशी, ख्रिस्ती सर्व धर्माचे येथे किती तरी लोक. येथे सर्व धर्माची पूजास्थाने. सारे प्रांत, सार्या जातीजमाती, सारे धर्म यांचा महान मुंबापुरीत संगम झालेला आहे. हिंदुस्थानभर अशी काही मानवसंगमतीर्थे आपण निर्माण करू या.
मद्रास, कलकत्ता, मुंबई ही शहरे म्हणजे सर्व भारतीयांची जणू आहेत. आपण वाद न माजवता असे नाही का म्हणू शकणार? मुंबईतील महाराष्ट्रीयेतर म्हणेल, ''आपण मुंबई सर्वैक्याचे प्रतीक करू या. सर्वांना एकत्र नांदवण्याचा प्रयोग करणारे तीर्थक्षेत्र करू या.'' तर किती सुंदर झाले असते! परंतु त्यांच्याजवळ ही द्दष्टी नाही. ते ''आमचे पैसे, आमचे कारखाने, आमचे बंगले, आमचे वैभव'' अशी भाषा बोलू लागतात. मग साहजिकच महाराष्ट्रीय म्हणतो, ''हे सारे वैभव आम्हीच निर्मिले. श्रमून, झिजून. आमचीच मुंबई, तुमची नाही.'' भारतीय ऐक्याचे प्रतिक, या भावनेने फार तर मुंबई स्वतंत्र ठेवा, असे नम्रपणे, भक्तीभावाने एखादा भारतीय भावनेत रंगलेला माझ्यासारखा दूरचा मनुष्य म्हणू शकेल. मला एक मित्र म्हणाला, ''तुमचे असे मत असले तरी कृपा करून लिहू नका, बोलू नका.'' मी म्हटले, ''मी लिहिले किंवा बोललो म्हणून त्याचा परिणाम होणार आहे अशी भीती तुला वाटायला नको. ही भावना माझ्या मनातच मला पूजावी लागेल.'' प्रांतांच्या उभारणी नि संहारणी यात मला गोडी नाही. थोडा भाग इकडे वा तिकडे, मला त्यात विषाद नाही. काटेकोरपणा सोडून थोर दृष्टिनेच हे प्रश्न सोडवायला हवेत, अलग व्हायचे असेल तर व्हा, परंतु द्वेष-मत्सर वाढणार नाहीत म्हणून जपा. अखिल भारतीय द्दष्टी ठेवा. फुटीरपणा वाढीला न लागो. प्रत्येक प्रान्ताची मोठी स्वतंत्र संस्कृती आहे असे नाही. भारतीय संस्कृतीचाच सुगंध प्रान्तांतून घमघमत आहे. भाषा निराळी, थोडे रीतिरिवाज निराळे, परंतु तुम्हा सर्व भारतीयांचे हृदय एक.