हिंदुस्थानवर ज्या मोठमोठया आपत्ती कोसळल्या, त्यातून पार पडून हे राष्ट्र उभे आहे. याचा अर्थ अजून राष्ट्राचे हृदय शाबूत आहे, असाच करावयास हवा. राष्ट्रे जगतात ती त्यांच्या पुण्यांशावर. राष्ट्राच्या जीवनात जे काही टपोरे, निर्मळ असते त्यातूनच राष्ट्र प्राणमय शक्ती मिळवत असते. प्राचीन काळापासून ॠषीमुनींनी, संतांनी, महात्म्यांनी, अज्ञात अशा कोटयवधी जीवांनी तेथे जी तीळतीळ पवित्रता ओतली, प्रेम ओतले, मानवता दाखविली, त्याग केले त्याच्यावर भारत उभा आहे. आज सर्वत्र बुजबुजाट असला तरी या सर्व विषांना पचवून ती पूंजीभूत पारंपारिक पुण्याई राष्ट्राला नवजीवन देत आहे. परंतु राष्ट्राचे हे पूंजीभूत भांडवल संपले तर? आज नवीन चारित्र्य निर्माणच होत नसेल तर, भर पडत नसेल तर मात्र धोका आहे.

महायुध्दाच्या वेळेपासून सदगुणांचा र्‍हास झाला आहे. लहानांपासून मोठयापर्यंत तात्पुरत्या दोन दिडक्या मिळून चैन कशी करता येईल इकडे लक्ष आहे. गिरणी मालकांनी, धान्यवाल्यांनी, लोक उपाशी आहेत, लोक उघडे आहेत, हे पाहूनही बेसुमार नफेबाजी केली आणि लहानांनीही तेचे केले. आगगाडीतील चहा विकणारा, सहा कपांचे दूध आठ कपांना पुरवून दोन कपांची किंमत खिशात टाकतो; रेशनिंगचे धान्य, कापड आणून, त्याचा काळाबाजार करून, त्या पैशात दारू पिणारे वा सिनेमा पाहणारे गरीबही आहेत. रेल्वे तिकिटांच्या काळयाबाजारालाही अशीच सीमा नसते. लोक तर चढतातच. पावती मागणाराजवळ भर दाम-दंडासह, बाकीचे हात ओले करून निसटतात. जेथे पाहावे तेथे घाणच घाण दिसते. या सर्व लहान-थोरांना एकच प्रार्थना की हे राष्ट्र जिवंत राहायला हवे असेल तर पूर्वीची पुण्याई पुरणार नाही. तुम्ही सारे अनीतीचे, खोटयानाटयाचे, लाचलुचपतीचे, फसवणुकीचे पुतळे होत असाल तर या देशाला आशा नाही.

आज देशाला सोन्यापेक्षा, डॉलरपेक्षा चारित्र्याची जरुरी आहे. शेक्सपियर कवीने म्हटले आहे, ''जो माझे पैसे चोरतो तो कचरा नेतो, परंतु माझे चारित्र्य कोणी चोरले तर त्याने माझे सारे काही नेले असे होईल.'' ज्या देशात लोकमान्य महात्माजी, रवीन्द्रनाथ, मदनमोहन मालवीय अशी नररत्ने झाली - त्या देशात काळाबाजार का? लाचलुचपत का? सत्यासाठी प्रसिध्द असलेल्या भारतात सत्याचा अस्त का व्हावा? सदगुण असतील तर वैभव. लक्ष्मी चंचल नाही, मनुष्य चंचल आहे. जेथे गुण असतील तेथे भाग्य येईल. आपल्या देशात सामाजिक जीवनाची आज जाणीव नाही, म्हणजेच धर्म नाही. सर्वांच्या धारणेचा जेथे विचार होतो तेथे धर्म आहे. तुम्ही काय निर्माण करीत आहात हा प्रश्न आहे. त्याग, ध्येय-निष्ठा, सत्यता, बंधुता, मानवता, अखंड उद्योग, करुणा, दया, धैर्य हे गुण राष्ट्रात सतत दिसले पाहिजेत. चार मोठया माणसांनी राष्ट्र मोठे होत नाही. सर्व जनतेची उंची वाढवायला हवी. नवीन पिढी चारित्र्यसंपन्न होवो. आज भारताला अन्नवस्त्राहून चारित्र्यसंपन्न माणसांची जरूरी आहे. प्राण गेला तरी खोटे बोलणार नाही, अनीतीने पैसे मिळवणार नाही, लाच मागणार नाही, दुलर्‍यास सतावणार नाही, अशा वृत्तीची निःस्पृह, निर्मळ,  सेवापरायण माणसे राष्ट्राला हवी आहेत. कोणत्याही विचारसरणीचे असा, परंतु असत्याचे आणि अन्यायाचे असू नका. काही वृत्तपत्रेही किती असत्य लिहितात ते सांगायला नको. चुकून असत्य लिहिले तर क्षमा मागता येते, परंतु जाणूनबुजून असत्याचा प्रचार करणे हेच ज्यांचे व्रत त्यांना काय सांगायचे? आणि पुन्हा सत्य-अहिंसेचा उदो उदो ही पत्रे करीत असतात. थोडी तर सदबुध्दी शाबूत ठेवा म्हणावे, हे राष्ट्र महान व्हावे, वैभवसंपन्न व्हावे, थोर भूमिकेवरून जावे असे तुम्हा सर्वांना वाटते? महात्माजींचे नाव ना येता-जाता घेता? मग थोडा प्रांजलपणा का दाखवीत नाही? परंतु हे कोणी कोणास सांगायचे?  अंतःकरण मृतवत असेल तर काय करायचे?

महाराष्ट्रा, तू पैशाने गरीब असलास तरी सार्वजनिक चारित्र्याच्या संपत्तीत तरी गरीब होऊ नकोस. सदगुणांनी संपन्न हो. महाराष्ट्रातील तरुणांनो, कोणत्याही दृष्टीकोनाचे असा, परंतु सत्य व प्रामाणिकपणा यांना विसरू नका. पेपर कळले म्हणून विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल तर राष्ट्रमातेच्या डोळयांतून खिन्नतेचे अश्रू आले असतील. ती माता असत्यातच मोठेपणा मानणार्‍या , आनंद मानणार्‍या  मुलांविषयी का अभिमान बाळगील? कोटयवधी अशी सत्त्वहीन संताने असण्यापेक्षा मी निपुत्रिक असते तरी सत्त्वाने जगले असते, असे भारतमाता म्हणत असेल. ही भरतभूमी सत्यासाठी विश्वविख्यात होती. सत्यासाठी वनात जाणारा प्रभू रामचंद्र यांची जयंती आपण केली; ते सत्य जीवनात नसेल तर कोठला राम? आणि जेथे सत्याचा राम नाही ते राष्ट्र असून नसल्यासारखे आहे. भारतभूमीचे इतर सारे गेले तरी पर्वा नाही. तिचे सत्व न जावो, तिची सदगुणसंपत्ती न जावो हीच प्रार्थना.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel