आमच्या ओठावर मोठमोठी वचने, देवता सर्वत्र आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र तो आहे. आजीपासून पंडितांपर्यंत सारे असे म्हणाले, परंतु माणसाला दूर ठेवतील. म्हणून तुकाराम म्हणाले,

घरोघर अवघे झाले ब्रह्मज्ञान
द्या रे एक कण जरी नीरें !


घरोघर देवतांची चर्चा आहे. सर्वत्र ज्ञानेश्वरीवर प्रवचनें, कीर्तने आहेत. परंतु एक कणभर शुध्द ब्रह्मज्ञान असेल तर द्या, तुकाराम महाराज म्हणतात. बडबड म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हे उत्तरोत्तर सहानुभूति वाढणे म्हणजे ब्रह्मज्ञानाचा उदय.

आता आषाढी एकादशी. पंढरपूरला मोठा सोहळा. लाखो लोकांची यात्रा. अनेक संतांच्या पालख्या येथे येतात. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची. अनेक पालख्या पंढरपूरला जातात. यंदा सज्जनगडाहून पालखी येणार आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांनी जो पंथ सुरू केला त्याला वारकरी पंथ म्हणतात. समर्थांच्या संप्रदायाला धारकरी म्हणतात, परंतु हे दोघे पंथ परस्पराला पूरकच होते. वारकरी पंथाने महाराष्ट्रात एकता निर्माण करावयास अपार मदत केली. पंढरपूरच्या वाळवंटात तरी भेदभाव दूर केला. महाराष्ट्रातून लाखो लोक एकत्र यायचे, पायी यायचे, नामघोष करीत यायचे. आपण सारे एक, एका राष्ट्राचे ही भावना बळावे. पुण्याहून या पालख्या जातात. केवढा सोहळा. लोक आंबे, केळी यांचा पालख्यांवर वर्षाव करतात. लहान मुले पालख्या करून ग्यानबा-तुकाराम करीत या मिरवणुकीत सामील होतात. न्यायमूर्ती रानडे माहित आहेत ना? पुण्याच्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या इमारतीतून रानडे ती श्रध्दा, तो त्याग, ते भक्तिप्रेम पाहून सदगदित झाले. त्यांचे डोळे भरून आले. ज्यांनी ही निष्ठा दिली ते किती थोर!

नवीन निष्ठा द्यावयाची असेल तर ती त्यागानेच देता येईल. पंढरपूरला एकदा एक वेश्याकन्या आली. बादशहाचे तिच्यावर प्रेम. ती म्हणाली, ''पांडुरंगाला भेटून येते'' आणि देवाच्या चरणावर डोके ठेवले. असा त्याग पंढरपूरला ओतला गेलेला आहे. परंपरा उगीच नाही सुरू होत. कुत्र्यासही तूप देऊ पाहणारे नामदेव, कोठारे लुटवणारे दामाजी, विष्णुमय जगत पाहाणारे तुकाराम, शांतिसागर एकनाथ आणि ती ज्ञान वैराग्याची मूर्ति ज्ञानदेव सर्वांची पुण्याई पंढरपूरला ओतलेली. लाखो लोक तेथे जमतात. त्यांच्या श्रध्देला हसू नका. तुम्ही त्यांच्यात मिसळा, नवीन विचार द्या, परंतु मानवधर्माने द्या. मारामारी, कत्तलीने नका देऊ. संतांनी हा मानवधर्म दिला. म्हणून ग्यानबा, तुकाराम हीच महाष्ट्राची दैवते राहिली. हेच राष्ट्रपुरुष म्हणून महाराष्ट्र ओळखतो. कारण त्यांचा संदेश सकळ मानवांना सुखी करण्यासाठी होता. भेदांना दूर करून सर्वांमधील दिव्यता दाखविणारा त्यांचा संदेश होता. संतांची शिकवण आज अधिकच आवश्यक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel