अखेरची काही पत्रे

: एक :
६ मे १९५०

मला सितारामनाना आठवल्यामुळे त्यांच्या घरचाच तो मुलगा आठवतो. दुपारच्या वेळेस तो आंबे काढावयास गेला. उंच झाड आणि वारा सुटला जोराचा. तो खाली येऊ लागला. परंतु त्याचा हात निसटला. तो खाली पडला उंचावरून, आणि तात्काळ देवाघरी गेला. घरी माणसे वाट बघताहेत-की अजून जेवायला येत कसा नाही? तो हाकाहाक कानी आली. कसले जेवण नि काय! मरण कोणाला कुठे कसे येईल याचा नेम नसतो. जणू कोणी ओढून नेतो. आपल्या विठोबारावांचा मुलगा नाही का? मागे विहिरीतून चांगला पोहून वर आला. परंतु म्हणाला, ''पुन्हा दोन उडया मारून येतो.'' आणि त्याने पुन्हा बुडी मारली. परंतु वर आला नाही. त्याला का मृत्यूने ओढून नेले? गावोगाव अशा गोष्टी असतात. मला मावशी बडोद्याची गोष्ट सांगावयाची. नर्मदाकाठच्या चांदोद कर्नाळी गावी लग्न होते. दुपारची जेवणाची पंगत मांडलेली. एक मुलगा नर्मदेवर गेला. तेथे नर्मदेत सुसरी नि मगरी. ती बघ एक सुसर तीराजवळ आहे, आणि मुलाला एकदम ओढून घेऊन ती गेली. मुलगा ओरडतो आहे! गेली सुसर! मंडपात बातमी आली. ज्याच्या त्याच्या तोंडचे पाणी पळाले. लग्नाचा समारंभ, आणि मरण येऊन उभे राहिले! सुख आणि दुःख ही जवळजवळ असतात. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे, ''जीवनाच्या पोटी येथे मरण आहे.''

होऊ दे या मरणाच्या गोष्टी. जीवन अनंत आहे. मरणही जीवनाचेच जणू रूप. मरण म्हणजे पुन्हा नवजीवन मिळविण्यासाठी घेतलेले तिकिट. सभोवती मरण असले तरी आपण जीवनाकडेच पाहतो

: दोन :
६ मे १९५०


परवा झोप येईना म्हणून मी आरामखुर्ची बाहेर टाकून एकटाच पडलो होतो. आकाश स्वच्छ होते. निळया-काळया आकाशातील तारे धुतल्यासारखे स्वच्छ होते. सर्वत्र शांत होते. मी आकाशात पाहत होतो. तार्‍यांचे मुके सकंप संगीत अनुभवीत होतो. वेदामध्ये वरूण ही आकाशाची देवता आहे. वरूण म्हणजे आच्छादन घालणारा. हा आकाशाचा देव पुढे समुद्राचा कसा झाला कोणास कळे. वेदांत वरूण ही नीतीची देवता आहे. तार्‍यांच्या हजारो डोळयांनी तो तुमचेकडे बघत आहे असे वर्णन येते. मला त्या वर्णनाची परवा आठवण झाली. जणू विराट विश्वंभर बघत आहे असे वाटले. ते सहस्त्र डोळे माझ्या जीवनात घुसत आहेत असे वाटले. मी घाबरलो. आपले सारे जीवन कोणी बघावे असे आपणास वाटत नाही. जीवनात नाना खळमळ असतात. दडून राहिलेल्या शेकडो गोष्टी. वरून  रंगीत दिसणारे कृत्रिम फळ आत मातीचे वा शेणाचे असते. मी डोळे मिटले आणि उठून घरात आलो. केव्हा झोप लागली कळलेही नाही. उठलो तो मन शांत होते. झोप म्हणजे जणू अमृत, नवजीवनदायी अमृतांजन! विश्वमातेचा प्रेमळ हात! झोपेचा केवढा उपकार! परंतु झोप म्हणजे लहानसे मरण. मोठी झोप म्हणजे मोठे मरण! म्हणून मरणाचेही उपकार! मरणही सुंदर, जीवनही सुंदर ! गंमत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel