वेदांतील ॠषी वाणीविषयी काय म्हणतो? ती वाग्देवता म्हणते,

''अहं राष्ट्री संगमनी जनानाम्''

पृथ्वीमोलाचा संदेश. वाणी सर्व राष्ट्रासाठी आहे. राष्ट्रातील सर्वांना जोडण्यासाठी. मग ते कोणत्याही धर्माचे असोत. आर्य आणि नाग आम्ही शेषशायी विष्णू निर्मून एकत्र आणले. जनांचे संगम करणारी मी आहे असे वाग्देवता सांगते. अनेक मानवी प्रवाहांना एकत्र आणणारी. संगम आपण पवित्र मानतो. त्रिवेणी संगम अधिकच पवित्र. तीन नद्या एकत्र मिळाल्या म्हणून जर पवित्र तर नाना धर्मांचे मानवी प्रवाह एकत्र आणण्यात किती पवित्रता? महर्षी अण्णासाहेब कर्वे आत्मचरित्रात म्हणतात, ''मुरुड गाव वसवणार्‍या  पूर्वजांनी गावात मुसलमान आले तर त्यांच्या मशिदीसाठी जागा योजून ठेवल्याय'' शिवाजीमहाराज सूडाचे गणित नाही करीत बसले. मराठयांनी अजमेरचा नादुरुस्त दर्गा दुरुस्त करून दिला. मित्रांनो, आज तुमच्या वाणीसमोर हे महान कार्य आहे. तुमची वाणी 'संगमनी जनानाम्' होवो. कला जोडते. तोडत नाही.

गीतेत 'वेदानाम् सामवेदोऽस्मि' असे म्हटले आहे. मी मनात म्हणे, ''ॠग्वेद महत्त्वाचा असून सामवेदाला का महत्त्व?'' मला लक्षात आले की, सामदेव हा संगीताचा वेद आहे. ॠग्वेदातील मंत्र संगीतात बसविले की सामवेद. आणि संगीत ऐकणार्‍यांची साम्यावस्था करते. सारे एका भावनेत पोहू लागतात. आपणास असे संगीत निर्मायचे आहे. विविधेतून एकता निर्मायची आहे. तुमची वाणी भारतीय ऐक्य प्रस्थापो. सर्व जातीजमातींचे धर्माचे ऐक्य. साम्राज्यशाहीने दहा हजार वर्षाचा प्रयोग खंडित केला. तो पुन्हा सुरू करायला उभे राहा.

तुम्हाला हे द्वेषमत्सर, हे दैन्य, ही विषमता पाहून बेचैन वाटायला पाहिजे. द्वेषमत्सर जातीजमातीतील दूर करण्यासाठीच लेखणी हाती घ्या. नागपूर हिंदुस्थानच्या मध्ये उभा आहे. जणू भारताचे हृदय. येथे बंगाली लोक आहेत, तामीळ, तेलगू आहेत. येथे हिंदी आहे. मराठी आहे. येथील मराठीच्या उपासकांनी या इतर भाषांतील गोडी मराठीत ओतावी. परस्परांचा परस्परांस परिचय करून द्यावा. ऐक्य वाढवावे. हे एक महान कार्य आहेच, शिवाय आर्थिक विषमता दूर करण्याचे काम आहे. तोवर समाजात आनंद येणार नाही. सभ्दावना फुलणार नाहीत; जोवर एक तुपाशी आणि एक उपाशी आहे. मी तुरुंगांत होतो. एक हरिजन कैदी मला म्हणला, ''माझ्या घरी पत्र लिहा.'' का बरे तो मुलगा आईला मारायला धावला? घरी गरिबी. आई त्याला म्हणायची, ''ऊठ लवकर, जा रानात, आण मोळी. तो दहा, बारा बारा वर्षांचा पोर एखादे दिवशी थंडीत नसेल उठला, रागावला असेल आईवर. त्याची मातृभक्ती दारिद्रयाने नष्ट केली आणि मातेची वत्सलता दारिद्रयानें गोठली. हे दारिद्रय दूर व्हायला हवे. तुमच्या सर्व लेखण्या यासाठीच झिजवा. जातीय विषमता दूर व्हावी म्हणून तुम्ही तुमची साहित्यिक शक्ती घेऊन या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel