ज्या समाजात ज्ञानेश्वर, तुकाराम झाले, तो समाज शतखंड का? त्या समाजात द्वेषमत्सराचा बुजबुजाट का? ज्याला त्याला आपली जात, आपला प्रांत, आपला धर्म श्रेष्ठ वाटून तो दुसर्‍यांचे निसंतान करायला निघतो. तुकाराम म्हणतात,

देह आणि देहसंबंधि निंदावीं
आणिक वंदावीं श्वानसूकरे


तू तुझ्या जवळच्यांचे दोष बघ, आणि तुला जे वाईट वाटतात त्यांचे गुण बघ. समाजात हीच शिकवण द्यायला हवी आहे, तुकारामांच्या पुण्यतिथीचा हा त्रिशतसांवत्सरिक उत्सव होईल. व्याख्याने, किर्तने, भजने, मिरवणुकी, सर्व काही होईल, परंतु या सर्वांचा जीवनावर काही परिणाम झाला तर उपयोग!

संतांची ध्येये ही क्षणिक राजकीय ध्येयाहून महान् असतात. ख्रिस्ताने शेजार्‍यांवर प्रेम करा सांगितले; परंतु जगाला अजून तो धडा शिकायचा आहे. संतांची ध्येये मानवजातीला कवटाळणारी असतात. त्यांच्यासमोर जातीधर्मनिरपेक्ष मानवजात उभी असते. सर्व भूतल म्हणजे त्यांना स्वदेश वाटतो.

आमुचा स्वदेश । भुवनमयी वास ॥
सारे त्रिभुवन त्यांना स्वतःचे वाटते.


वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें

झाडे-मोडे, पशुपक्षी यांच्यावरही त्यांचे प्रेम असते. अशा प्रेमसागर संतांची पुण्यतिथी साजरी करून आपल्या सभोतालच्या जीवनात प्रेमस्नेह आणू या. सहानुभूति, उदारता आणू या. गरिबांचे दुःख दूर करू या. त्याग शिकू या. आज खरा धर्म उरलाच नाही म्हणून ही मारक विषमता आहे, या युध्दच्या भीषण छाया आहेत. संतांची पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे गंमत नव्हे. ती पुण्यतिथी सर्वांना अंतर्मुख बनवो, मानवधर्माची नवप्रेरणा देवो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel