गुजराथमध्ये तेव्हा मुसलमान अंमल होता. मराठयांनी गुजराथ जिंकला. परंतु गायकवाडांनी राज्यभाषा मराठी नाही, गुजरातीच ठेवली. त्यांनी तुमच्या भाषेवर कधी आक्रमण केले नाही. विलीनीकरणास तात्काळ त्यांनी संमती दिली. महाराष्ट्र दिलदार आहे. तो अन्यायाने अतिक्रमण करणारा नाही.

पालघर येथे मागे ठाणे जिल्हा महाराष्ट्राचाच, वारलींची भाषा मराठीच, म्हणून घोषवायला मोठी सभा झाली होती. आता बेळगावला संयुक्त महाराष्ट्राची परिषद आहे. पुन्हा १४ तारखेला जिल्हा प्रातिनिधिक परिषद आहे. उंबरगाव, डहाणू वगैरे भागांतील गावोगावच्या पंचायतीचे ठराव आहेत. ठाणे जिल्हा महाराष्ट्राचा, डांग भागही महाराष्ट्राचाच. बेळगाव व कारवारकडील जो भाग सलग मराठी बोलणारा असेल त्या बाबतीत कन्नड बंधूजवळ प्रेम, स्नेहाने वाटाघाटी कराव्या. थोडा भाग इकडे तिकडे केला तरी दुःख नको. आपण शेवटी भारताची लेकरे-कोठेही असलो तरी भारतात आहोत.

मुंबईची बृहन्मुंबई बनवावयाची, तिकडे वसईपर्यंत गुजराथ आहे असे म्हणावयाचे, आणि महाराष्ट्राची या पट्टयातून हकालपट्टी झाल्यावर बृहन्मुंबईने ठराव करावा की, महागुजराथेत आम्ही सामील होतो. द्वारकेपासून मुंबईपर्यंत 'गरवी गुजराथ' वैभवाने उभा राहील असे हे आक्रमक धोरण. महाराष्ट्राच्या थडग्यावर गुजराथचे वैभव उभे राहणार का? वैभव भारताचे वाढवायचे आहे. ना गुजराथचे ना महाराष्ट्राचे. आणि भारताचे वैभव त्या त्या प्रान्तांना तेव्हा वाढवता येईल जेव्हा त्यांचे तुकडे तुकडे केले जाणार नाही. महाराष्ट्र विस्कळीत ठेवणे हा का धर्म? ही का नीती ? ही का सत्य अहिंसेची प्रीती ?

पंडित नेहरूंनी प्रान्तांच्या स्वतंत्र-करणाची घाई करू नका म्हणून प्रार्थना केली होती. आज देशभर शान्त वातावरण नाही. सर्वत्र कडवटपणा भरलेला. हिंदू-मुसलमानांची अंतःकरणे दुखावलेली. सूड, द्वेष, मत्सर ह्यांच्या वृत्ती अजून न शमलेल्या. अशावेळी आणखी प्रान्तीय भावनांनी प्रक्षोभी वादळे नका उठवू. थांबा थोडी वर्षे. इतकी वर्षे गेली, देशाच्या कल्याणासाठी आणखी थोडी कळ सोसा; असे त्यांचे सांगणे होते. परंतु ते त्या त्या अलग होणार्‍या  प्रांतांना पटले नाही. आपल्यावर दुसर्‍याचे आक्रमण होत आहे ही जाणीव असली म्हणले मग मनुष्य थांबावयास तयार नसतो. पैशाच्या जोरावर आपल्याला मागे रेटण्यात येत आहे ही तीव्र जाणीव होताच मनुष्य अस्वस्थ होतो. तुम्ही सर्वत्र पाय पसरत चालतात, दहा वर्षांनी आणखी काय होईल देव जाणे! मुम्बईच काय सारा ठाणे जिल्हाही जायची पाळी यायची अशी भीती वाटली म्हणजे मनुष्य सावध होतो. म्हणून ताबडतोब प्रान्त करा अशी संयुक्त महाराष्ट्राची मागणी आहे.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel