परंतु परीक्षेत हे जे असत्याचे विराट दर्शन झाले ते सर्वत्रच आहे. व्यापारी, कारखानदार यांच्याजवळही सत्य ही वस्तू नाही. माल जवळ असून खुशाल नाही सांगतात. अधिक पैसा देतो त्याच्या घरी पाठवतात. नियंत्रित दराने मिळणे कठीण जाते. मधले दलाल दुप्पट किंमत घेऊन इंजिनें देतात. आणि काँट्रॅक्टर लोक व बोर्ड, म्युनिसिपालटया यांचा कारभार तर केवळ असत्यावर चालला आहे म्हणाना. रस्ते दुरुस्तीसाठी इतकी खडी घातली म्हणून बिले तयार होतात, परंतु काँट्रॅक्टर निम्मी सुध्दा खडी घालत नाहीत. रस्ते पुन्हा रद्दी. बिले होत आहेत, पैसे जात आहेत, एका जिल्हा बोर्डाच्या अहवालात एक लोखंडी तुळई वाळूने खाऊन नाहीशी केली. मुंबईच्या म्युनिसिपालिटीतही मागे हिशोबाची चर्चा झाली. जमाखर्च तपासणार्याने शेरा मारला आहे म्हणतात की, कशाला काही मेळ नाही. तरीही सारे साजिरे केले गेले. सत्य म्हणून वस्तूच नाही. एका गृहस्थाजवळ एक इंजिनिअर बोलत होते. ते म्हणाले, ''लढाईत खड्डे खोदण्याचे एक कंत्राट घेतले. २० हजारांच्या कामात काँट्रॅक्टरला दहा हजार फायदा झाला. त्या गृहस्थाने विचारले, ''हे कसे शक्य?'' ''अहो, वरच्या अधिकार्याला दहा हजारांची लाच दिली. दहा मी खिशात टाकले. खड्डे खणले होते, पण काही उपयाने ते बुजले असा शेरा मारला.'' महायुध्दाच्या काळात मिलिटरी काँट्रॅक्टरनी लाखो रुपये मिळविले. लाच दिली की सारे होईल, हीच सवय आजही आहे कसे या देशाचे व्हायचे? परकी सरकार जाऊन स्वतःचे सरकार आले तरी जोवर सार्वजनिक सदगुण नाही तोवर सारे फोल आहे.
सरकार दारूंबदीवर आपली शक्ती केन्द्रित करीत आहे. परंतु शेकडो ठिकाणी दारूच्या भट्टया गुप्तपणे चालत आहेत. या कोण पकडणार? लोकांचे संवाद कानी येतात. भट्टीवाल्याकडून मोठमोठया रकमा पोलिस अधिकार्यांकडे जातात. हे खरे का? कोणाला साडेतीन हजारांचा हप्ता, कोणाला पाच हजारांचा हप्ता, कोणाला सात हजारांचा असे पैशाचे रतीब लागलेले आहेत असे लोक म्हणत असतात. पूर्वीचे राजे वेष पालटून हिंडत असत. लोक काय बोलतील असतील तर? खरे म्हणजे सर्व बडया अधिकार्यांच्या इस्टेटीची एकदा चौकशी झाली पाहिजे. दोनशे रुपये पगार असेल तर मी मौल्यवान फर्निचर ठेवू शकेन का? मोटर ठेवू शकेन का? हिंदुस्थानभर गेल्या आठ दहा वर्षात सार्वजनिक नीतीचा चक्काचूर झाला आहे. लाचलुचपतीची जडलेली ही सवय राष्ट्र पोखरून टाकीत आहे. परंतु पोलिस खातेच असे असेल असे नाही. सर्वत्र तीच तर्हा.
कारखानदारांची 'आम्ही सचोटीने वागू, प्रामाणिकपणाने वागू' अशी एक संस्था आहे. ठरलेल्या स्टँडर्डप्रमाणे जो वागू इच्छील त्यानेच या संस्थेचे सभासद व्हायचे असते. हिंदुस्थानातील फक्त १७ कारखानदार या संस्थेचे सभासद आहेत. त्यांतही बरेचसे विदेशी आहेत. प्रामाणिक वागायला हिंदी कारखानदार का मूर्ख आहेत? एका गिरणीतले एक अधिकारी सांगत होते की, 'मँचेस्टरचे अमुक एक कापड स्टँडर्ड ठरले म्हणजे ते स्टँडर्ड कधी खाली येत नाही. परंतु आपल्याकडे एखाद्या गिरणीने नवीन चांगला नमुना काढावा, त्याचा बोलबाला झाला की लगेच दोनचार महिन्यात मिक्सिंग करतील, वाईट कापूस वापरतील, ते स्टँडर्ड नाहीत.'' आमची दानत का अशाने वाढेल? हे चित्र पाहून मन एक प्रकारे सचिंत होते.
महात्माजींनी ह्या देशाला, जगाला मौल्यवान देणग्या दिल्या आहेत. सर्व देणग्यांचे सार म्हणजे महान् नैतिक शक्ती त्यांनी दिली. ते म्हणत, ''सदगुणसंवर्धन म्हणजेच स्वराज्य'' अशी पृथ्वीमोलाची वाक्ये वाचून काही लोक टिंगलही करीत. परंतु आज त्या वाक्यांकडे अधिकच तीव्रतेने लक्ष जात आहे. गांधीजींवर अमेरिकन लेखक डॉ. स्टॅन्ले जोन्स याने जे नवीन पुस्तक लिहिले आहे त्यात तो म्हणतो, ''गांधीजींची चळवळ म्हणजे चारित्र्य निर्माण करणारी थोर शक्ती होती.''