आज मी काँग्रेसमध्ये नाही. ध्येयभूत काँग्रेस माझ्या हृदयात आहे. गरिबांना जवळ घेणारी, जमीन नाही त्याला जमीन देणारी, कोठे आहे ती काँग्रेस? ती माझ्या स्वप्नात आहे. ती ध्येयभूत काँग्रेस मला समाजवादी पक्षाजवळ दिसते. म्हणून त्यांच्याविषयी मला प्रेम वाटते. आस्था वाटते. समाजवादी पक्ष आज निर्मळ मार्गाने जाऊ इच्छितो. लौकर समाजवाद यावा म्हणून त्याची धडपड. संयमाने, धीरोदात्तपणाने तो पक्ष जात आहे, परंतु त्या पक्षाबद्दल श्रध्दा नि निष्ठा मला असली तरी मला त्यांचे संघटनात्मक काम जमत नाही. त्यांच्या कायद्यांचा अभ्यास, त्यांच्या दैनंदिन तक्रारी सोडवणे, मिटवणे, लेबर ऑफिसरकडे जाणे, औद्योगिक कोर्टात जाणे, सरकारी मंत्र्यांस भेटणे, मला हे जमत नाही. त्याप्रमाणेच शेतकर्‍यांचीही संघटना मी करू शकत नाही. त्यांचे प्रश्न सोडवणे, कुळकायदा अभ्यासातून त्यांना न्याय मिळवून देणे, सहकारी संस्था चालवणे, मला हे जमणार नाही. एक प्रकारे मी अशा कामाला अक्षम आहे.

मग माझे काम काय, ध्येय काय? समाजवादाचा मोघम प्रचार मी लेखनाने, बोलण्याने करीत असतो. उदार विचारांचा प्रचार व्हावा म्हणूनही मी धडपडतो. जातिधर्मातीत दृष्टी भारतीयांना यावी असे मला वाटते. समाजवाद यायला हवा असेल तर जातिभेद, प्रांतभेद, भाषाभेद आपण विसरणे अवश्य आहे. मानवतेचे वातावरण सर्वत्र आले तर समाजवाद येथे वाढणे सोपे होईल, म्हणून सेवादलाकडे माझा ओढा. सेवादलाची मुले भंगी, मुसलमान, हरिजन सर्वांना घरी जेवायला बोलावतात, आपण त्यांच्याकडे जातात हे ऐकून मी उचंबळतो. सेवादल नवराष्ट्र निर्माण करीत आहे असे मला वाटते.

ज्या लहानशा खोलीत भारताची सारी लेकरे एकत्र जेवत आहेत, प्रेमाने बोलत आहे, तेथे भारतमाता आहे, तेथे परमात्मा आहे. समाजवाद, सेवादल यांच्यासाठी म्हणून माझा जीव तळमळतो. मुंबईचा परवांच्या निवडणुकीच्या वेळेस मी झोपताना देवाला म्हणे, 'देवा, गरिबांच्या या पक्षाला यश दे. या मित्रांना ना वृत्तपत्र, ना पैसा, ना सरकारी पाठिंबा. एकीकडे जातीय लोक, दुसरीकडे सत्ताधारी श्रीमंत लोक, यांच्यामध्ये समाजवादी पक्ष उभा आहे. महाराष्ट्रीय बहुसंख्य मतदार. तरी एक गुजराथी मित्र उभा. समाजवादी उमेदवार यशस्वी होणे म्हणजे भारतीय वृत्ती यशस्वी होणे. हा गुजराथी, हा महाराष्ट्रीय आम्ही जाणत नाही. कोणत्या तत्त्वासाठी, सिध्दांतासाठी व्यक्ती उभी आहे हे आम्ही बघतो.' पुरुषोत्तम यशस्वी झाले ही फार मोठी गोष्ट आहे. समाजवादी वृत्ती देशात वाढणे ही अति मोलवान वस्तू होय.

एक काळ असा होता की, ज्या वेळेस सारे सोडून कोठे हिमालयात जावे असे मला वाटे. देव भेटावा असे वाटे, परंतु विकारांनी बरबटलेल्यास ना देव ना धर्म. देव हिमालयात भेटतो आणि येथे नाही का? प्रभूचा साक्षात्कार म्हणजे सर्वत्र मंगलाचे दर्शन, आपापल्या ध्येयासाठी झगडत असताही दुसर्‍यांविषयी मनात सहानुभूति ठेवणे. आज मला देव भेटायची तहान नाही. मी माझ्या जीवनात धडपडत असतो. आपल्या क्षुद्रतेला जिंकू पाहात असतो. प्रभूचे स्मरण होताच जेथे असेन तेथे मी डोके ठेवितो, नि मला समाधान लाभते. मला ऐक्याची तहान आहे. भारताला मी जगाचे प्रतीक मानतो. भारताच्या सेवेत मानवजीतीची सेवा येऊनच जाते. तेथे सारे धर्म, सर्व संस्कृती. रामकृष्ण परमहंसांनी सर्व धर्माचा साक्षात्कार करून घेतला. महात्माजींनी सर्व धर्म जीवनात आणले. दिवसेंदिवस आपण सर्वांनी ही एकता, विश्वात्मकता अनुभवायची आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel