आज स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारावयाची आहे. भाषावर प्रांतरचना पूर्वीच मंजूर झालेली आहे, परंतु अशी रचना केली जात असता द्वेष, मत्सर न फैलावीत परस्पर प्रेम राहो, सहकार्य राहो. भारताचे एक हृदय आहे- ही जाणीव सर्वांना असो.
परमेश्वराला सहस्त्रशीर्ष, सहस्त्राक्ष अशी विशेषणे आपण देतो, परंतु सहस्त्र-हृदय असे विशेषण कधीच आढळत नाही. परमेश्वराला हृदय एकच, त्याप्रमाणे भारताचे प्रान्त अनेक झाले तरी अंतकरण एक असो.
भारताची एक संस्कृती आहे. प्रत्येक प्रांताची एक विशिष्ट अशी संस्कृती कोठे आहे? थोडेफार फरक असतील, परंतु तेवढ्याने संस्कृती भिन्न नाही होत. भारतातील प्रत्येक प्रान्ताची का भिन्न संस्कृती आहे? भारतीय संस्कृतीची ध्येये आपल्या संस्कृत ग्रंथातून आहेत.
वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, स्मृतिपुराणे-दर्शन यातूनच आपणास ध्येये मिळाली. संस्कृतातीलच हे ध्येय-घोष प्रांतीय भाषांतून जनतेचे कैवारी जे संतकवी त्यांनी दुमदुमविले. कृतिदासांचे रामायण बंगालीत, श्रीधरांचा रामविजय मराठीत, कंश्रयचे रामायण तामीळमध्ये. परंतु त्या त्या प्रान्तांतील जनतेला त्यांच्या त्यांच्या भाषेतून राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान यांचे जे आदर्श मिळाले ते का निरनिराळे आहेत? भगवान शंकराचार्य जन्मले मलबारात, परंतु तो ज्ञानसूर्य हिंदुस्थानभर गेला. द्वारका, जगन्नाथपुरी, बदरीकेदार, शृंगेरी-चारी दिशांना चार पीठे स्थापून संस्कृतीचे ऐक्य निर्माण करता झाला.
शंकराचार्याच्या अद्वैताचा सुगंधच सर्व प्रान्तीय भाषांतील साहित्याकाला येत आहे. तुकारामाच्या अभंगात, नरसी मेहतांच्या भजनात, रवींद्रनाथांच्या गीतांज्जलीत, श्री बसप्पांच्या वचनात एकाच संस्कृतीची ध्येये दिसून येतील. भारतीय संतांनी आणि आचार्यांनी भारतीय संस्कृती एकरूप केली.
नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथात जातात, कबीराची गाणी नि दोहरे, मीराबाईंची उचंबळवणारी गीते, गोपीचंदांची गाणी सर्व हिंदुस्थानभर गेली आहेत. दक्षिणेकडील यात्रेला उत्तरेकडील लोक येत. उत्तरेच्या यात्रांना दक्षिणेकडील. संस्कृतातून चर्चा चाले. तीच प्रांतीय भाषांतून मग जाई. अशा प्रकारे अखिल, भारतीय संस्कृती आपण निर्मिली.
भारतीय संस्कृतीच्या कमळाच्या अनेक पाकळया म्हणजे या प्रांतीय संस्कृती अलग नाहीत. परवा कलकत्त्यात डॉ. कटजू आले होते. त्यांचे स्वागत कताना बंगाली पुढारी म्हणाले, ''बंगाली संस्कृती निराळी आहे. तिच्या विकासात अडथळे आणू नका.'' बंगाली संस्कृती निराळी म्हणजे काय? तुमचे विवेकानंद, विद्यासागर, रामकृष्ण, बंकिम, रवीन्द्र, शरदबाबू-यांनी का असे काही दिले की जे इतर प्रान्तात नाही, जे इतर प्रान्तांच्या परंपराहून निराळे आहे? आज प्रत्येक प्रान्ताला असे वाटू लागले आहे की, आपण इतरांहून अगदी वेगळे, निराळे. बाबांनो, भाषा निराळी बोलत असाल, परंतु आईच्या दुधाबरोबर एकच संस्कृती भारतीय मुलांना पाजली जात आहे हे विसरू नका.