परवा सकाळी झाडांवर दूर बगळे बसलेले पाहिले. हिरव्या हिरव्या झाडांवर ते पांढरे जणू गुच्छ ! किती सुंदर दिसत होते. ते दृश्य ! एखादे वेळेस सायंकाळी निळया आकाशातून हे बगळे रांगेने जात असतात. जणू आकाशात कोणी रांगोळी काढीत आहे, आकाशाच्या निळया फळयावर रेघ ओढीत आहे असे वाटते. बगळा दिसतो ढवळा, परंतु आत काळा! ध्यानस्थ बसेल नि पटकन् मासा मटकावील. पंपासरोवरावर रामलक्ष्मण येतात. राम म्हणतो, ''लक्ष्मणा, ते बघ धर्मनिष्ठ बगळे!'' -पश्य लक्ष्मण पंपायाम् बकः परमधार्मिकः॥''
पाऊस ओसरला. मी परवा बाहेर पडलो. सृष्टी धुतल्यासारखी दिसत होती. नद्यानाले पुन्हा खळखळ वाहत होते. पाणी पुन्हा स्वच्छ झाले होते आणि चरायला नेलेल्या म्हशी पाण्यात बसल्या होत्या. तोंडे तेवढी वर ठेवून रवंथ करीत होत्या. एकमेकींच्या अंगावर माना ठेवीत होत्या. जणू त्या सुखावल्या होत्या. म्हशींना पाऊसपाणी फार प्रिय. लठ्ठ प्राण्यांना पाण्याशिवाय जगवत नाही. हत्तींनाही जलक्रिडा फार आवडते. वरून पाऊस पडत असावा, म्हशी सुखाने चरत असतात, त्यांच्या त्या तुळतुळीत काळसर पाठी आकाशातील काळया ढगांसारख्या दिसतात. मृच्छकटिक नाटकात हा 'मेघ आर्द्र महिषादरतुल्य काळा' असे सुंदर वर्णन आहे. मृच्छकटिक नाटकाचा कर्ता पावसाचा भक्त असावा! चारुदत्त व वसंतसेना जातात. मोठा सुंदर प्रसंग. वरून देवाघरची वृष्टी हृदयाकाशातून प्रेमाची वृष्टी!
पहाटे फिरायला गेले की कृत्तिकांचा, द्राक्षांच्या घडासारखा सुंदर पुंजका दिसतो. कार्तिक स्नान करणारे हे नक्षत्र दिसत आहे तोच थंड पाण्याने आंघोळ करतात. आश्विनाच्या वद्य प्रतिपदेपासून कार्तिक स्नानास आरंभ करतात. लहानपणी आई मला उठवी. मी विहिरीवर जाऊन स्नान करायचा. ते सारे आठवले.
अपार धुके पडले होते. उंच गवतामधून मी जात होतो. अंगावरचे सारे कपडे ओले होते. दवाने भिजलेले गवत मलाही आर्द्र करीत होते. समोरचे दिसत नव्हते काही. दव पडू लागले म्हणजे पाऊस गेला असे म्हणतात. कोळी गवतांमधून किंवा कुंपणांतून जाळी विणतात. सूर्यप्रकाशात ही जाळी हिर्या माणिकांप्रमाणेच चमकतात. जणू परींची सोनेरी, रुपेरी मंदिरे आणि या जाळयांत अनेक जीवजंतू अडकतात. कोळी मेजवानी करतो!
वर अनंत आकाशात अनंत तारे दिसत. भारताचा सारा इतिहास वर रंगवून ठेवला आहे. डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी पूर्वज आहेत. तो धृव वर आहे. ते सप्तर्षि आहेत. ययातिशर्मिष्ठा आहेत. ते सत्यवचन मृग तेथे आहेत. तो श्रावण आईबापांना कावडीत नेणारा तेथे आहे. प्रोफेसर आपटे आम्हाला तार्यांची माहिती सांगताना रंगत. खेडयातील वृध्द माणसांना तार्यांची किती माहिती परंतु आम्हाला एक चंद्र ओळखता येतो. बाकिच्यांची माहिती शून्य.