काल रात्री मी अंगणात एकटाच फिरत होतो. किती वाजले होते कळेना. थोडया वेळाने कोंबडा आरवला. म्हणजे प्रहरभर रात्र असावी. पाऊस थांबला होता. केळांब्याच्या डोक्यावर चंद्र होता. ढगांबरोबर तो लढत होता. क्षणात ढगांच्या लाटात तो बुडे, गुदमरे. त्याच्या धडपडीचा प्रकाश ढगांतूनही थोडा थोडा दिसे, परंतु क्षणात अजिबात दिसेनासा होईल. तो पुन्हा तोंड वर करी आणि हसे. मी बघत होतो. आपले मन असेच आहे. अंधाराशी, निराशेशी ते झगडत असते. क्षणात निरुत्साही विचार त्याला बुडवतात, परंतु पुन्हा उत्साहाचे त्याला भरते येते. मोठी गंमत आहे. जीवन म्हणजे ओढाताण. परंतु आपण विजयी होऊ या श्रध्देनेच धडपडत राहिले पाहिजे. आत्मविश्वास हवा. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याच्या जीवनाला काय अर्थ?
मला सेवादलाच्या मुलांना घेऊन जावे असे वाटते. सेवादलाचे वर्ग नको शहरात, नको खेडयात. ते दाट जंगलात भरवावे. सृष्टीच्या सान्निध्यात. निसर्गात राहावे आठ-दहा दिवस. तेथे नदी मात्र हवी. नदीसारखा आनंद नाही. डुंबायला, पोहायला पाणी हवे. कपडे धुवायला, भांडी घासायला नदीवर जाता येते. रानांतील झाडेमाडे, लता-वेली, फुले यांची मुलांना ओळख करून देता येईल. आपल्याला कशाची माहिती नसते. चार झाडांची, चार फुलांची नावे माहीत नसतात. मोठमोठया जंगलात प्रचंड वेली प्रचंड वृक्षावर चढलेल्या असतात. कधी दोराप्रमाणे त्यांचा उपयोग करून वर चढता येते. जणू वृक्षांनी खाली सोडलेले मजबूत दोर. कधी दोन झाडांच्या मधून या वेली गेलेल्या असतात. त्यांच्यावर झोके घेता येतात. भारतीय संस्कृती तपोवनात जन्मली, सृष्टीच्या सान्निध्यात संवर्धिली गेली.
आणि तेथे पाखरांची ओळख होते. नाना रंगाचे नि आकारांचे पक्षी. त्यांचे ते निरनिराळे आवाज. पालगडच्या किल्ल्याजवळच्या राईत मोर आहेत. लहानपणी त्यांचा आवाज ऐकला म्हणजे मी नाचत असे. मोराचा तो उत्कट आवाज मला फार आवडतो. मोरोपंतांनी देवाचा धावा मांडला. त्याला त्यांनी 'केकावलि' असे नाव दिले. 'आर्या केकावलि' व 'पृथ्वी केकावलि' अशा दोन केकावलि मोरोपंतांनी लिहिल्या. पृथ्वीवृत्तातील त्यांची केकावलि फार प्रसिध्द आहे. विनोबाजी विद्यार्थी असताना बडोद्यास केकावलितील श्लोक मोठयाने म्हणत आणि सारी आळी दणाणवीत. मला केकावलि फार आवडे. मी ती सारी पाठ केली होती. 'सुसंगति सदा घडो' वगैरे केकावलितील श्लोक पूर्वी मुलांना पाठ येत. मोराच्या आवाजाला 'केका' असा शब्द आहे. मोरोपंतांनी स्वतः मोर कल्पून या काव्याला केकावलि असे नाव दिले. पाखरांचे आवाज ऐकण्यात एक विशिष्ट आनंद असतो. दुपारची वेळ व्हावी. पक्षी वडासारख्या मोठया झाडावर दुपारी विसावा घ्यायला बसतात. गोड किलबिल चाललेली असते. अशा वेळेस झाडांच्या बुंध्याशी डोके ठेवून ती किलबिल ऐकत ऐकत झोपी जाण्यात एक मधुर सुख असते. मला पाखरे पाहण्याचा लहानपणी फार नाद होता. लहानपणी आपला आत्मा मोकळा असतो. आपल्या मनोबुध्दीला जणू त्यावेळेस पंख असतात. पुढे वाढत्या वयाबरोबर शेकडो चिंता येतात. आपले पंख जणू तुटतात. हृदयावर बोजा असतो. मग पाखरे आवडेनाशी होतात.