लोकमान्यांनी गीतारहस्य लिहून अर्पण कोणाला केले? 'श्रीशाय जनतात्मने' जनतारूपी प्रभूला त्यांनी अर्पण केले. जनता हा त्यांचा देव होता. तुम्हा साहित्यकांचाही जनता देव होवो. जनतेचे स्वरूप काय, तिचे सुखदुःख, तिच्या गरजा, यासाठी तुमचे वाङ्‌मय असो. कला आनंदासाठी असते ही गोष्ट खरी. परंतु मला क्षणिक आनंद नको आहे. उपनिषदे, ब्रह्मज्ञानही आनंदासाठीच आहेत. ब्रह्मांची द्वारकाच आनंदरूप अशी केली आहे. आजचे जीवन निरानंद आहे. तेथे सुंदरता नाही. सर्वत्र दैन्याची, वैषम्याची कुरूपता भरली आहे. भरपूर पीक यायला हवे असेल तर शेतकरी कुंदा खणून टाकतो. टपोरे बी पेरतो. आपणासही समाजात आनंद यावा असे वाटत असेल तर सारा कुंदा खणून काढावा लागेल. रूढीचे, संकुचित विचारांचे तण लेखणीच्या नांगराने काढा. तुमच्या लेखणीची महान शक्ती आहे. रूसो, व्हॉल्टेर यांनी क्रांती केली. मार्क्सने क्रांती केली, अंकल टॉम्स केबिन कादंबरीने क्रांती केली. आपल्याला क्रांती करायची आहे. मूल्ये बदलायची आहेत. क्रांती म्हणजे रक्तपात नव्हे. आज श्रमणार्‍यांला मान नसेल नि ऐदी शेणगोळयाला लोड मिळत असेल, तर हे चूक आहे असे दाखवा. श्रमणार्‍यांची प्रतिष्ठा निर्मा, नि बांडगुळांना भिरकावून द्या. याला क्रांती म्हणतात.

अशी क्रांती तेव्हा कराल- जेव्हा तुम्ही जनतेच्या जीवनात बुडया घ्याल. परमेश्वराला कवीचा कवी असे म्हटले आहे. कारण तो सर्व विश्वविषयी सहानुभूति बाळगतो. लहानशा फुलपाखराच्या रंगासमोर तुमच्या पातळाचे काठ खाली माना घालतील. तो मुंगीची काळजी घेईल. तृणपर्णाला जपेल. तुमची सहानुभूती ज्या मानाने व्यापक त्या मानाने तुम्ही मोठे साहित्यिक व्हाल. शेक्सपिअरच्या नाटकात सर्व धंद्यातील भाषा सापडेल. व्हिक्टर ह्यूगोला अमक्या धंद्याची भाषा माहीत नाही असे नाही. ते सर्वांत मिसळत, उठत, बसत. गाडीवान असो, झाडूवाला असो, सर्वांजवळ बोलतील, समजू घेतील. अशी व्यापकता तुमच्या अनुभवाला हवी. ज्ञानेश्वरींत कोणणातील 'मुडा' वगैरे शब्द आहेत. ते त्या बालवयात किती हिंडले हरी जाणे. शंकराचार्य हिंदुस्थानभर गेले. पंडितांसाठी भाष्ये, तर सामान्य जनतेसाठी स्तोत्र लिहीत होते. सर्व जनता त्यांचेसमोर आहे. जनतेचे प्रश्न हाती घेताहेत. नाना दैवताची भांडणे होती. त्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. 'आणा सारे देव एकत्र. सर्वांची स्तोत्रे देतो करून. एकच तत्त्व आहे.' असे म्हटले.

तुम्हाला भारताचा इतिहास शब्दा शब्दात सापडेल. शब्दब्रह्माची उपासना करून मुक्त होता येते. पाणिनी मुक्त झाले. मराठीत हरिहर वगैरे नावे आहेत. शिवनारायण वगैरे मारवाडी नावे असतात. महान् ऐक्याचा तो प्रयोग होता. आपण भांडलो परंतु पुढची पिढी तरी न भांडो असे या नावे ठेवणार्‍यांच्या मनात असेल. ज्याने आपल्या मुलाला 'हरिहर' नांव आरंभी ठेवले असेल तो केवढा क्रांतिकारक! शैव-वैष्णवांचे भांडण त्याने मिटवले. दोन्ही दैवते त्याने एकत्र आणली.

भारताचा हा मोठेपणा उच्चरवाने सांगायला हवा आहे. सर्वत्र द्वेषमत्सर आहेत, जातीयता आहे. तुम्ही सांगा की, सर्वांना जवळ घेण्यात भारताचे अमरत्व आहे. समुद्र आटत नाही. कारण तो सर्वांना जवळ घेतो. भारत सर्वांना जवळ घेई. म्हणून अजून कालोदारात गडप नाही झाला; परंतु आमचा जो मोठेपणा, ज्यात आमचे अमरत्व-तेच आम्हांला आज नकोसे झाले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel