मुसलमानी धर्मात ही समानता आहे. बाहेर कोणी अमीर असेल, फकीर असेल परंतु मशिदीत तरी सारे समान. आपल्या देवळात आहे का ही स्थिती? तेथेही आपली भांडणे, श्रेष्ठिकनिष्ठपणाचे वाद. तेथेही सर्वांना प्रवेश नाही. माणसाला दूर करणार्‍याजवळ देव नसतो. थोर कवी रवीन्द्रनाथ यांनी एक सुंदर गोष्ट कवितेत लिहिली आहे. एक पुजारी देवपुजेसाठी जात असतो. सोवळा आहे तो. हातात पूजेचे ताट आहे. धूपदीप, फुले, उदबत्त्या, कापूर सारे आहे. आपल्या पाठोपाठ कोणीतरी येत आहे असे त्याला वाटले. तो मागे वळून बघतो, ''कोण रे तू? हो दूर. शिवशील, सावली पडेल. हो दूर. मी सोवळा आहे. हो दूर. तिकडे चालता हो.'' असे म्हणत तो मंदिरात येतो, परंतु त्याला मंदिरात देवाची मूर्ती दिसत नाही.

'करा रे, वाजवा रे नगारे, देवाची मूर्ती कोणी चोरली. धावा, धावा,' असे तो ओरडतो. चारी दिशांनी लोक येतात, धावतात. त्या पुजार्‍याने ज्याला हिडीस फिडीस करून घालवलेले असते. त्याच्याजवळ सर्वांना मूर्ती दिसते. ''पकडा त्या हरामखोराला. तो बघा मूर्ती घेऊन जात आहे. केव्हा गेला मंदिरात? पकडा,'' असे म्हणून सारे धावतात. तो चोर सापडत नाही. ते थकतात. इतक्यात चोर अद्दश्य होतो. कोठे गेला? पाताळात गेला की आकाशात? सारे वरखाली चोहोबाजूला टकमक बघू लागतात. इतक्यात समोर चतुर्भूज सावळी मूर्ति त्यांना दिसते. ते लोटांगण घालतात. ''देवा, तू इकडे कोठे होतास?'' ते विचारतात.

''मी तुमच्या मंदिरातून चाललो. त्या माणसाला हो दूर, हो दूर, असे हा पुजारी म्हणत होता. त्या माणसात का मी नव्हतो? माणसाला दूर हो म्हणणारा देवाला दूर हो म्हणत असतो. म्हणून मी चाललो.''

बंधूंनो, सर्वात तुच्छ वस्तू म्हणजे माती, दगडधोंडा. त्या मातीची  मंगलमूर्ती बनवून तिच्यात आपण प्रभूचे सौंदर्य बघतो. दगडाची मूर्ति बघून तिच्यात प्रभूला पाहतो. मग चैतन्यमय माणसात तो का पाहात नाही? वडपिंपळ, उंबर पाहून नमस्कार करता, परंतु माणसाला का दूर करता? माणसांचा अव्हेर करणार्‍याला कोठला देव?

धर्म हा जोडणारा असतो. तोडण्यासाठी तो नसतो. समाजाची धारणा ज्याने होते तो धर्म. कोकणात घराचा जो आधारभूत खांब, आधारभूत तुळई, त्याला धारण म्हणतात. धारणाची पूजा करतात. आंब्याचे डहाळे बांधतात, कारण सारे घर त्यावर आधारलेले. धर्म म्हणजे सर्वाचा साधार, परंतु ज्या समाजात कोटयावधी लोक दूर फेकले आहेत, तेथे का धारणाप्रधान धर्म शिल्लक आहे? तो समाज धर्महीन आहे. शतखंड झालेला तो असणार.

समर्थ म्हणाले, ''आपणास चिमोटा घेतला । तेणे जीव कासावीस ॥ आपणांवरून दुसर्‍याला । ओळखीत जावे ॥ - मला कोणी चिमटा घेतला तर मला दुःख होते, असे दुसर्‍यास चिमटा घेतला तर दुसर्‍यास होते हे ओळखणे म्हणजे धर्म.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel