समाजसेवेचे आवडीप्रमाणे कोणी कोणतेही काम करावे. समाजदेवाची त्या कर्मद्वारा नीट सेवा केली तर मोक्ष तुमच्या हातात आहे. श्रेष्ठकनिष्ठपणाची थोतांडे मिथ्या आहेत. यासाठी तर संतांनी भागवत धर्माचा पुकारा केला. सारे एकत्र देवाची लेकरे म्हणून राहू. ज्ञानेश्वरांनी महान् ध्येय महाराष्ट्रसमोर ठेवले.
अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक
ही त्यांची भव्य प्रतिज्ञा. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ते म्हणतात,
जो जे वांछील तो ते लाहो
सर्वांना सारे काही मिळो. अर्थात् जे चांगले आहे, मंगल आहे ते मिळो, कारण त्याच्या आधी त्यांनी म्हटले आहे,
दुरितांचे तिमिर जावो
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो
पापाचा अंधार जाऊ दे. सारी मानवजात आपापल्या आवडीचे कर्म करू दे. म्हणजे मग सर्वांना सर्व मिळेल. तुम्ही निष्पाप सुखे आस्वादू नयेत असे नाही.
त्यांचे म्हणणे. संत रानावनात गेले नाहीत. जनतेत राहूनच त्यांनी उदात्त जीवनाचा आदर्श घालून दिला.
विधीने सेवन
धर्माचे पालन
तुम्ही सुखोपभोगाला काही मर्यादा घाला म्हणजे धर्माचे पालन केल्यासारखे होईल. गीता म्हणते,
धर्मा ऽ विरुध्दे भूतेषु
कामोऽस्मि भरतर्षम
धर्माला अविरोधी अशी कामवृत्ती. तीही माझेच स्वरूप समज असे भगवान् म्हणतात, परंतु अविरुध्द शब्द महत्त्वाचा आहे. जीवनात प्रमाणबध्दता ठेवणे म्हणजेच प्रसन्नता आणणे. गीतेत 'युक्ताहारविहारस्य' असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरीतील या श्लोकावरील ओव्या प्रसिध्दच आहेत. मोजके बोला, मोजकी झोप घ्या, मोजके खा, अशा रितीने त्या त्या इंद्रियाना प्रमाणात द्याल तर जीवनात प्रसन्नता वाढेल, जीवनात सुंदरता येईल.