''चला आतां जाऊं'' आई म्हणाली.
''चल ताई'' वडील प्रमानें म्हणाले.
बाळाला घेऊन काशी उठली. परंतु रंगप्रेमी रंगा रडूं लागला.
''मी म्हणत होतें, घरी जाऊं. आतां रडायला लागला बघ.'' आई म्हणाली.
''रंग दिसत नाहीं म्हणून तो रडत आहे'' काशी म्हणाली.
''एवढ्यांत त्याला काय कळणार रंग नि बिंग. चला लौकर. दे माझ्याजवळ त्याला. नीट गुरंगटून घेतें म्हणजे वारा लागणार नाहीं.''

आजीनें नातवाला घेतलें. त्याचें रडणें थांबलें. तो झोंपी गेला. सारीं घरीं आलीं. बाळाला अंथरुणावर ठेवण्यांत आलें.
''आई, झोपेंत हंसतो आहे बघ बाळ.''
''मुलें अशींच हंसतात. तूं लहानपणीं झोपेंत हंसायचीस व जागेपणीं रडायचीस''
''मी का रडवी होतें बाबा ?''
''अग मुलें रडतातच.''
काशी सासरीं जायला निघाली. शेजारच्या धोंडोपंतांबरोबर ती पतिगृहीं आज जाणार होती. आईनें बरोबर लाडू वगैरे दिले. बाळाला जप म्हणाली. बाळकडु घालीत जा. तिन्हीसांजा मीठ मोहर्‍या काढित जा, अंगारा लावित जा, आईनें सांगितलें. देवांच्या, मायबापांच्या पायां पडून, शेजारीं सर्वांना विचारुन काशी मोटारींत बसली. तिचे डोळे भरुन आले.

''ये हो. बाळाला सांभाळ'' आई म्हणाली.
''पत्र पाठव'' वडील म्हणाले.
पों पों करीत मोटार निघाली. बाळ वाटेंत फारसा रडला नाही. आईच्या मांडीवर निजून होता. मोटारच्या मुक्कामावर आनंदराव आले होते. काशीनें त्यांच्याचजवळ बाळ दिला. दोघांचीं जीवनें एकत्र जोडणारा तो प्राणमय दुवा. आनंदरावांनी बाळाकडे पाहिलें. त्याचे डोळे, त्याचं काळेंभोर जावळ, ती सुंदर मूर्ति पाहून पित्याला कृतार्थ वाटलें. काशी खालीं उतरली. हमालानें सामान घेतलें. सारीं घरीं आलीं. शेजारच्या आयाबाया आल्या. मित्र आले. सर्वांनी बाळाला पाहिले. नयनमनोहर बाळ !

बाळ वाढत होता. त्याचें रडूं थांबवायची एक युक्ति असे. रंगीत खेळणीं, रंगीत फुगे, रंगारंगांची फुले दाखवलीं कीं त्याचें रडें थांबायचें. त्या लहान बाळाची जणूं समाधि लागे. आनंदराव एका वकीलाकडे कारकून होते. सायंकाळीं घरीं आल्यावर ते बाळाला घेत, हिंडवीत. कधीं त्याला सार्वजनिक बागेंत नेत, कारंजें दाखवीत, फुले दाखवीत. रविवारीं त्याला ते घरी खेळवायचे, बोळकीं रचायचें, रंगांचे तुकडे जोडायचे. बघे बघे नि रंगा एकदम हात मारुन सारें पाडी नि हंसे. रंगाला फुलपांखरें, पांखरें म्हणजे केवढी गंमत ! एके दिवशी काशीनें पिंवळें फुलपाखरुं हळूंच पकडलें नि रंगाजवळ आणलें. रंगा बघत राहिला. तिनं एकदम सोडतांच पटकन् पांखरुं गेलं वर. रंगानें टाळी वाजवली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel