नयनानें दुधगांवला तार दिली. रंगाला घेऊन वासुकाका निघाले. परन्तु आईचे प्राण निघून गेले होते. नयनानें रंगाचा फोटो आईच्या हृदयाशीं ठेवला होता.

वासुकाका नि रंगा आले. तों सारें शून्य होतें. रंगा आईच्या शांत देहाजवळ बसला.

''आई'' दोनच अक्षरें त्यानें उच्चारिली. आईच्या चरणांवर त्यानें डोकें ठेवलें. तो डोकें उचलीना.

''रंगा, मी आहें तुला. ऊठ बाळ. नयना, त्याला घेऊन जा'. वासुकाका म्हणाले.

वासुकाकांचे स्नेही आले. इतर मंडळी आली. वासुकाकांनींच अग्नि दिला' रंगाला त्यांनीं बरोबर नेलें नाहीं. तो चितेंतहि उडी घेईल ते म्हणाले.

नयना नि रंगा दोघें बसलीं होतीं.

''आईची सेवा तूं केलीस. नयना तूं भाग्याची. मी कपाळकरंटा. आईला सुख देईन म्हणून माझी आशा. सारीं स्वप्नें संपली. भंगलीं.''

''रडूं नको रंगा. आईनें एकदां तुझी आठवण केली. रंगा असें म्हणाली. मी म्हटलें काशीताई. रंगाची काळजी नका करुं. मी तुझा फोटो त्यांच्या हातांत दिला. त्या हातांना का कळलें ? त्या हातांना का डोळे होते ? त्या निर्जीव होत जाणार्‍या हातांनीं तो फोटो घट्ट धरला. पकड सुटेना. मी तो हळूच हृदयाशीं ठेवला. उगी रंगा. तुझ्या आईचे हाल नाहीं झाले. माझ्या गादीवर निजविलें डॉक्टर किती आले होते. परंतु उपाय चालेना. काय करणार आपण ? माझी आई लहानपणींच गेली. तुला आतांपर्यंत तरी देवानें दिली.''

''तुझे बाबा आहेत.''
''तुला थोर वासुकाका मिळाले आहेत.''
आणि रंगाचा मित्र पंढरी आला. दोघे मित्र भेटले. रंगाला रडूं आवरेना.

''रंगा, उगी. अरे मी लहानपणापासून पोरका आहें. माझ्याकडे रंगा बघ आणि डोळे पूस. चल. आपण बाहेर जाऊं''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel