''काका, माझा पुन्हां भार ?''
''बाळ, तुझा का आम्हांला भार आहे ? काळजी नको करु. कोठे तरी नोकरी मिळले. नाहींतर वर्ग चालवीन. मला सारे विषय येतात. पुस्तकें लिहीन.''
''रंगा, जपून रहा. काकांचे ऐकत जा. आईला पत्र पाठवित जा. माझी काळजी नको करुं'' काशीताई त्याला जवळ घेऊन सांगत होत्या. त्यांनी लोंकरीचा एक उबदा विणला होता. तो त्याला त्यांनी जातांना दिला.
स्टेशनवर सारीं आली. गाडी तयारच होती. काशीताई खालीं फलाटावर उभी होती.
''जपा सारीं'' ती म्हणाली.
''रंगाची काळजी नका करुं'' काका म्हणाले.
''सुटींत या. तुम्ही स्वत:ची काळजी घ्या'' सुनंदा म्हणाली. शिट्टी झाली. गाडी हळुहळु निघाली. आणि हळुहळु अश्रूहि बाहेर पडले. रंगा आईकडे बघत होता. आईला वर बघवेना. गेली गाडी. आतां रंगाला रडें आलें. त्याला हुंदका आला.
''उगी रंगा. दिवाळीला आणूं हं आईला.''
थोड्या वेळानें तो शांत झाला. गाडी भगभग् सणसण् करित जात होती.
काशीताई सेवासदनांत आल्या. त्या आल्या तों दारांत नयना.
''केव्हां आलीस नयना ?''
''आज दुपारी. रंगा बरा आहे ?''
''बरा आहे. तो आतां लांब गेला. वासुकाकांची येथली नोकरी गेली. ते दुधगांवच्या शाळेंत गेले. त्यांनीं रंगालाहि बरोबर नेलं. तेच आतां त्याचे मायबाप. मी कोण ? मी फक्त जन्म दिला. नयना, मी दुर्दैवी आहें.''
''असें नका म्हणूं, सारें चांगलें होईल'' ती म्हणाली.