मोटार लॉरी आली. सारें सामान तिच्यांत चढवण्यांत आलें. अमृतराव पत्नी नि मुलगी घेऊन निघाले. ताई भाऊजवळ एक शब्द बोलूं शकली नाहीं. लिली भाऊजवळ जाऊं शकली नाहीं. रंगा खोलींत दु:खगंभीर होऊन बसला होता. मोटार गेली. शेजारच्या खोलीकडे रंगानें शून्य दृष्टीनें पाहिलें. त्याचे अश्रु आतां धांवून आले. त्याला ताईच्या, तिच्या त्या अल्लड खेळकर लहान मुलीच्या शतस्मृति आल्या. आणि अमृतराव ताईला छळतील का, लिलीनें भाऊ म्हणून आठवण काढतांच तिला मारतील का, असे विचार त्याच्या मनांत आले. काय हें जग ? किती हे संशय ? आपणच दुदैवी असें त्याला वाटलें. मी जेथें जाईन तेथें कोणाचे भलें व्हायचें नाहीं. तो मनांत म्हणाला.
रंगा कांही करुं शकत नव्हता. त्याचें मन कशांतच रमेना. रंगेना. त्याची स्फूर्ति, प्रतिभा सारी संपलीं जणूं. सायंकाळ झाली. तो बापूसाहेबांकडे गेला. त्यानें त्यांना सारी हकीगत सांगितली. त्यांनी त्याला धीर दिला. ''जगांत हे असें प्रसंग येतातच. अशावेळेसहि शांत मनानें आपण राहिलें पाहिजे. पुष्कळवेळां ताईभाऊ म्हणतां म्हणतां निराळींच नातीं उत्पन्न होतात, असें नाहीं का अनुभवाला येत ? त्या अमृतरावांना तसें का वाटूं नये ? आपल्याला आपला तरी भरंवसा आहे का ? आपण आहांत का मनाचे स्वामी, इंद्रियांचे स्वामी ? आपण घसरणारी माणसें. तुकारामांनी म्हटलें आहे :
इंद्रियांची दीनें । आम्ही केलों नारायणें ॥
इंद्रियांच्या हातांतील आपण खेळणी असतों. खरें ना ? म्हणून शान्त हो. ताईची निष्पाप स्मृति जवळ ठेव आणि कामाला लाग. तूं फैजपूरच्या राष्ट्रीय सभेच्या प्रदर्शनासाठीं येणार आहेस ना ? कांही दिवसांची रजा घ्यावी लागेल. श्री नंदलाल तुला भेटतील. भारतांतील थोर देशसेवक बघशील. खेड्यांत भरणारें पहिलें अधिवेशन. रंगा ये बरें का प्रदर्शनाची मांडा मांड करायला.''
बापूसाहेब त्याच्याजवळ बोलत होते. त्याला शान्त करित होते. रंगा आज जेवलेला नव्हता. तो आज तेथेंच राहिला. रात्रीं जेवला तेथेंच झोंपला. सकाळीं जरा शान्त होऊन तो आपल्या खोलीवर गेला. जगाचे नानाविध अनुभव घेत बाळ रंगाच्या जीवनाला गंभीर रंग चढत होता.