''काशीताई, ध्रुवाला देव तीन दिवसांत भेटला. परंतु कांहींना हजारों वर्षे तपश्चर्या करुनहि तो भेटला नाहीं. असें का बरें असावें ?''
''त्यांची पूर्वजन्मींची तपश्चर्या आपणांस दिसत नाहीं. आणि किती काळ तपश्चर्या केली याला महत्व नाहीं. त्या तपश्चर्येत मन किती रंगलें होते ही मुख्य गोष्ट आहे. हजारों वर्षे जप केला परंतु मन दुसरीकडेच असेल तर तें सारें वाया नाहीं का गेलें ? या उलट क्षणभरच देवाला हांक मारली, परंतु त्या हांकेंत सारा आत्मा असेल तर देव धांवल्याशिवाय राहणार नाहीं. वासुकाका एकें दिवशीं रंगाला असें सांगत होते.''
''तुमच्या रंगाची पुण्याई कीं अशा थोरांजवळ त्याला धडे मिळत आहेत.''
काशीताई कामाला निघून गेल्या. नयना तें पदक बघत होती. ती तें मनगटावर बांधी, दंडाला बांधी. कपाळावर पिंगळपानाप्रमाणें धरी, तर गोपांत ओंवून गळ्यांत घाली. ती उठली. तिनें ट्रंकेंतून रंगाच्या हातचीं चित्रें काढलीं. त्या चित्रांकडे ती बघत बसली. त्या चित्रांच्या शेजारीं तिनें स्वत:ची चित्रें मांडली.
''रद्दी चित्रें, भिकार''
असें म्हणून स्वत:चीं चित्रें तिनें फाडून फेंकली. ती तेथें डोळे मिटून बसली. ती का साधना करित होती ?
रंगाचें एके दिवशीं सुंदर पत्र आलें.
''प्रिय आई,
तुझी किती आठवण येते ! तूं दिवाळींत नाहीं आलीस. आतां उन्हाळ्यांत येशील ? का ती नयना तुला पुन्हां नेणार ? नयना असें करील तर माझ्या डोळ्यांत खुपूं लागेल ती.
परवां आम्ही वनभोजनास गेलों होतों. दाट झाडींत आम्ही होतों. आणि सळसळलें कांही तरी. सर्प होता कीं काय ? लहानपणीं मी विंचवांजवळ, सर्पाजवळ खेळत असें. सापाच्या फणेवर मी हात ठेवला होता. होय ना ? मी त्या गोष्टी काकांना काकूंना सांगितल्या. काका म्हणाले, 'तरीच साप तुला भेटायला आला. परंतु आम्हां भित्र्यांना पाहून निघून गेला.' आम्ही मोर पाहिले. कसे ते छान ओरडत. तूं असतीस तर ? त्या नयनालाहि ही जागा आवडली असती.