तो केवळ पोटभर भाकर देऊन, अंगभर कपडा देऊन, चार वेळां सिनेमा दाखवून येईल का ? केवळ सुखांची रास मिळाली म्हणूनहि मानव मानव या अर्थानें सुधारेल असें नाहीं. परंतु हें सुखांत लोळणार्यांनीं म्हणणें शोभत नाहीं. पैसा म्हणजे माया हें वाक्य भांडवलदारांच्या तोंडी शोभत नाहीं. सर्वांच्या जीवनाच्या गरजा तर भागायलाच हव्यात. बुध्ददेव म्हणत कीं उपाशी मनुष्याला अन्नाच्या भाषेंत, अन्नाच्या प्रत्यक्ष चवीच्या व्दारेंच धर्म शिकवायला हवा. आणि आजचे बुध्द महात्माजीहि म्हणाले कीं जोंवर पोटभर अन्न मला सर्वांना देतां येत नाहीं, तोवर रामनाम तरी कोणत्या तोंडानें शिकवूं ? ज्ञानं ब्रह्म या व्याख्ये इतकीच अन्नं ब्रह्म ही व्याख्याहि अर्थगंभीर आहे. आम्ही लोकांना ज्ञानं ब्रह्म शिकवित राहिलों. परंतु त्याचा पाया जो अन्नं ब्रह्म तो मात्र शिकवला नाहीं. जग या अशाच धडपडींतून, क्रियाप्रतिक्रियांतून पुढें जायचें आहे.
सुनंदानें रंगाला तें सारें वृत्त कळविलें. तिनें त्यांत त्याला आणखी लिहिलें :
''तूं येथें आलास तर किती छान होईल ! मुंबईच्या कोंदट हवेंत तुला रहावें लागतें. ती दुसर्यांची ताबेदारीची नोकरी. कलावंताला जर कोणती गोष्ट मरणप्राय वाटत असेल तर ती दुसर्याची गुलामगिरी. आपल्या कलेला दुसर्याच्या लहरीवर नाचवणें म्हणजे खरोखर मरण. रंगा, तूं इकडेच ये. आपण एकत्र राहूं. तुझी प्रकृति बरी नसते असें ताई म्हणाली. प्रकृति बरी तर सारें बरें. तुला त्यांचीं स्वप्नें पूर्ण करायचीं आहेत. भारताचें नांव दिगंत करायचें आहे. यासाठीं तूं प्रकृतीची काळजी घेतली पाहिजेस. येथें सारें नीट जमेल. घरचें अन्न नि शुध्द हवा. त्या मंदिरांतील हृदयानुसार केलेली कलेची मुक्त पूजा. तुला आनंद होईल. ये. ते शेटजी ध्येयवादी दिसतात. ते दुधगांवला रहायला आले आहेत. ते साधक दिसतात. त्या राममंदिरांत ते मूर्तीसमोर बसतात नि त्यांच्या डोळ्यांतून अश्रु येत असतात. ते तुला कांहीं कमी नाहीं पडूं देणार. म्हणून नाहीं म्हणूं नकोस. तूं संमति कळव.''
आणखीहि कांही गोष्टी सुनंदानें लिहिल्या होत्या. रंगाला तें पत्र मिळालें. त्याला अलीकडे जरा बरें वाटत नसे ही गोष्ट खरी. तो खिन्न व सचिंतहि असे. सुनंदाआईजवळ रहायला त्याला मिळालें असतें. परंतु ताईचा प्रश्न होता. तो तिच्यापासून दूर होता म्हणून सारें ठींक होतें. तरी तिची ती पागल पत्रें येतच असत. दुधगांवला कसें व्हायचें ? परंतु मला तिची ही भावना जिंकून घेतलीच पाहिजे. माझी भावना निर्मळ नि प्रभावी असेल तर मी तिला ताई करीन, माझी बहीण करीन. तिची भ्रान्त मनोवृत्ति दुरुस्त होईल. मोहाजवळ राहून त्याच्यापासून अलिप्त असणें यांतच खरा पुरुषार्थ.
त्यानें जायचें ठरविलें. मुंबईचा गाशा त्यानें गुंडाळला. अनेक मित्रांना भेटला. त्यांना तो म्हणाला ''दुधगांवच आतां माझी कर्मभूमि, मृत्युभूमि. तेथेंच जगेन, मरेन. माझीं ध्येय तेथें बसून मूर्तिमंत करण्याचा आमरण उद्योग करीन. तेथें माझ्या लहानशा घरांत महान् संस्था सुरु करीन. माझी खोली म्हणजे माझ्या ध्येयाचें मंदीर. 'भारत-चित्रकला-धाम' अशी संस्था मला निर्मायची आहे. ती माझ्या मनांत आहे. दुधगांवला ती स्थापीन. घरावर पाटी लावीन, तुम्ही या मधून दुधगांवला. तुमच्या शहरीं नवनवीन कल्पना घेऊन या मला भेटायला. दुधगांवचा धबधबा, तेथील राममंदीर, मंदिरांतील मी आतां काढीन तीं चित्रें-सारें बघायला एकदां या. रंगाला विसरुं नका.''