''आई, मी मुंबईला जातें. कोठें तरी नोकरी चाकरी बघतें. तुमची जबाबदारी आतां माझ्यावर आहे.''
''नयना, कशाला तुला कष्ट ? मुंबईस कोठें राहणार, कोठें जाणार ?''
''रंगाच्या बापूंकडे जाईन.''
''ते देवमाणूस.''
नयनानें खरोखरच जायचें ठरविलें. तिनें बापूंना आधीं एक पत्र पाठवलें.
''ति. बापूंच्या चरणीं कृ. सादर प्रणाम.
मी रंगाकडून तुमच्याविषयीं ऐकत असें. त्याच्या जीवनांत अनेकांनीं अनेक रंग भरले. तुम्हीहि त्यांच्यापैकी एक. रंगाचें रमणीय जीवन एकाएकी संपलें. मी रंगाची पत्नी. माझें नांव नयना. रंगाची मानलेली आई व मानलेली बहीण यांचा सांभाळ आतां मी केला पाहिजे. मी मुंबईला येत आहें. प्रथम तुमच्याकडे उतरायला येऊं इच्छितें. मग कोठें मिळेल जागा. येऊं ना ? मुलींचा चित्रकलेचा वर्ग काढूं इच्छितें. तुमचा आधार द्या. सर्वांस स. प्रणाम
नयना''
बापूसाहेबांनी रंगाच्या निधनाची बातमी वाचली होती. दुधगांवच्या चित्रकाराचा मृत्यू अशी बातमी वर्तमानपत्रांत आली होती. बरेच दिवसांत त्यांना रंगाचें कांहीच कळलें नव्हतें. दुधगांवला कोणाकडे पत्र पाठवायचें, त्यांना कांहीं सुचेना. आज नयनाचें पत्र त्यांना मिळालें. त्यांनी सहृदय पत्र लिहून तिला बोलावलें. विनासंकोच या. आमच्याकडे रहा असें लिहिलें.
''आई, जातें मी. तुम्ही प्रकृतीला जपा.''
''आम्हांला देव कशाला नेईल ? तो गुणी लोकांना आधीं नेतो.''
''त्याला सारींच प्रिय. देवाचीं ना कोणी आवडतीं ना नावडतीं.''
नयना निघून गेली. मागें वडिलांकडे गेली तेव्हां डब्यांत एकटीच होती. आजहि एकटी. ती शून्य मनानें बसली होती. एकाएकीं तिचे डोळे भरुन आले. ती बोलूं लागली: ''रंगा, कां रे मला सोडून गेलास ? किती माझीं स्वप्नें, किती आशा ! कां रे राजा गेलास ? मी मुंबईस नोकरी करुन तुला आरोग्यधामांत ठेवणार होतें. ताई तुझ्याजवळ राहिली होती. मला किती आनंद झाला असता तुझ्यासाठीं श्रमतांना, काम करतांना. तूं बरा झाला असतास. शेवटचे दोन शब्दहि तुझ्याजवळ नाहीं बोलतां आले. मी दुर्दैवी. गाडीत मला वाटलेंच कीं कांही तरी होणार म्हणून. किती लगबगीनें घरी आलें. तों तूं चिरनिद्रेंत गेलेला. रंगा, माझी आठवण काढीत गेलास ? त्या तुझ्या अखेरच्या चित्रांत माझाहि एक आकार आहे असें वाटलें. शेवटच्या कुंचल्यानें अनंत आकृतींत तूं माझीहि आकृति रंगवली आहेस. रंगा, तुझें माझ्यावर खूप प्रेम होतें. मी तें जाणत होतें. तुझ्यासाठीं नाहीं रें कांहीं करतां आलें. बाबा, कठोर बाबा. त्यांना पाझर फुटावा म्हणून इतके दिवस तेथें राहिलें. ते नाहीं म्हणाले त्याचवेळेस निघून आलें असतें तर ?