''तुझी पट्टराणी म्हणून.''
''मला कोठलीच राणी अजून नाहीं.''

''म्हणूनच ही घे. मी का वाईट आहें रंगा ? हे बघ हात. हे का कोमल सुकूमार नाहींत ? मी तुझें जीवन सुखाचें करीन. माझ्या जीवनाचें खत तुझें जीवन फुलावें म्हणून नि:शंकपणें घालीन.''

''नको असें बोलूं.''
''मनांत उगीच कशाला ठेवूं ?''

''चल आतां जाऊं. तूं घरी जा.''
''तूं नाहीं माझ्याकडे येत ?''
''नाहीं.''

''मग या समुद्रांत मला बुडव, या वाळूंत मला तुडव.''

तिनें त्याचे हात धरले. ती पुन्हां म्हणाली :

''ने मला समुद्रांत. तुझ्या हातानें हें जीवन संपव. तुझ्या हातून येणारें जीवन वा मरण दोन्ही अमृतमयच आहेत. तुझ्या हृदयसिंधूंत डुंबायचें माझे भाग्य नसेल तर या समोरच्या सागरांत मला फेंक. कां कचरतोस ? हो कठोर.''

तो तेथें स्तब्ध उभा होता. वारा जोरानें वाहूं लागला. अकस्मात् ढग आहे. पाऊस येणार कीं काय ? टप् टप्.

''ताई जा घरीं; मी दादरला जातों.''

''मी येथेंच बसतें, सागरांत शिरतें; तूं जा. माझें प्रेम तुला मुक्त करित आहे. जा, रंगा सुखी हो.''

''तूं घरीं जा.''

''मला घर ना दार. मला सर्वत्र स्मशान आहे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel