''किती रे सगळीकडे काळें करतोस'' आई म्हणे.
''मला दुसरे रंग दे आणून. म्हणजे लाल करीन, हिरवें करीन. आई, मला हिरवीं झाडें काढायला आवडतात. खरेंच.''
रागावणारी आई हंसूं लागे नि रंगाचा ती पापा घेई. रंगाच्या पाठीवर काशीला मूलबाळ झालें नाही. एकुलता एक मुलगा. आनंदराव त्याचें कोडकौतुक करित. त्यानीं त्याला रंग आणून दिले, कुंचले आणून दिले. रंगा रंगवित बसे.
''आई, हें बघ तुझें चित्र.''
''माझें कशाला ? त्यांचे काढ.''
''याला मिशा लावल्या म्हणजे बाबा होतील.''
''वेडा आहेस तूं रंगा. अरे दुसरें कांहीं वाच. गणित कर.''
''आई, गणित म्हणजे दोन नि दोन चार हेंचना ? त्यांत ग काय कठिण आहे ? नुसते आपले आंकडे. आई, पांचाच्या आंकड्याचा मी अडकित्ता करुन दाखवूं ? दोनाच्या आंकड्याचें बदक करुं ? सहाच्या आंकड्याचा मासा करुं ? सांग.''
''तूं जादुगार आहेस वाटतें ?''
''हो. मी जादुगार. मला सारें येतें करतां.''
रंगा मोठा झाला. तो आतां चौथीत होता. चौथी झाल्यावर काय ? मामाकडे पुण्याला त्याला शिकायला ठेवावें असें काशीच्या मनांत होतें. परंतु निराळ्याच घटनेनें ती इच्छा पुरी होणार होती. एका तापाची सर्वत्र सांथ आली. घरोघर माणसें आजारी पडलीं. आनंदराव अंथरुणांत तापानें फणफणत होते. तिकडे काशीचे आईबाप तापाला बळी पडले. काशिनाथ रजा घेऊन घरीं आला होता. ती वार्ता ऐकून काशी रड रड रडली. माय तों माहेर. परंतु अश्रु पुसून ती पतीची सेवाशुश्रषा करित होती.
''काशी, मी बरा नाहीं होणार. रंगाला जप. तो गुणी मुलगा आहे. तूं पुण्याला काशिनाथकडे जा. तुझा भाऊ तुम्हांला सांभाळील. तूं एकुलती तर त्याची बहीण. कोठें आहे रंगा ?''
''तो झोंपला आहे.''