''नयना, कां तुरुंगात खितपत पडतेस ? तुरुंगांत बसून का स्वराज्य येतें ?''
''तर का घरीं माशा मारुन येतें ?''
''मला म्हातारपणीं दु:ख नको देऊं.''
''तुम्ही मला अनाथ केलें. माझा रंगा ! तुम्ही तुमच्या या मुलीला मदत देतेत तर त्याला मी वांचवूं शकलें असतें. या मुलीला विधवा केलेंत.''
''मरणोन्मुखाजवळ लग्न लावून पुन्हां मला दोष देतेस ?''
''परंतु तो वांचला असता. निदान खटपट तरी आपण केली असती. आतां मला कोठले घरचे पाश ? भारताचे पाश तोडणें हेंच आतां काम. रंगा म्हणे, भारताचें स्वतंत्र पार्लमेंट रंगवीन. रंगाचा चित्रसंग्रह स्वतंत्र भारताला मी अर्पण करीन. परंतु भारत आधीं स्वतंत्र तर हवा. ज्याला जें करतां येईल तें त्यानें करावें. मला माफी मागायला काय सांगतां बाबा ?''
''तूं तुझ्या पित्याला म्हातारपणीं एकटें सोडणार ? यासाठीं का तुला प्रेमानें वाढवलें ?''
''पर्वत नदीला जन्म देतो. परंतु नदी सागराकडे जाते. म्हणून पर्वताला का राग येतो बाबा ? मुली या शेवटीं दुसरीकडेच जायच्या असतात. आणि राष्ट्राच्या कामासाठी तर सर्वांनी धांवून यावें. तुम्हीहि तुरुंगांत या.''
''तूं नको मला शिकवायला. मी जातों. माझी मुलगी मेली म्हणून समजतों.''
पिता उठला. तिनें त्याच्या चरणांना प्रणाम केला.
''हें ढोंग कशाला ?''
''माझें हृदय देवाला माहीत.''
तो वृध्द पिता गेला. नयना आपल्या खोलींत येऊन कातीत होती. ती अशान्त होती, अस्वस्थ होती. इतक्यांत इंदु, विजया, लता तिच्या खोलींत आल्या.
''चला वर्ग घ्यायला'' इंदु म्हणाली.
''नयनाताई, मी काढलेलें चित्र दाखवूं ? हंसू नका हं'' लता म्हणाली.
''हंसण्यासारखें चित्र काढायचें नि हसूं नका म्हणायचें'' विजयानें चिडविलें.
''लतेला नका चिडवूं'' नयना म्हणाली.
''तुम्ही नेहमीं तिची बाजू घेता'' इंदू बोलली.
''लतेला आधार लागतोच'' नयना हंसून उत्तरली.
''तुमचा आधार तुरुंगापर्यंत. पुढचा बघायला हवा.''