''बरें नाहीं का वाटत ?''
''त्याला घेरी आली.''
''ते फार थकले आहेत. मी बसूं त्यांच्याजवळ ?''
''आतां डोळा लागला आहे. नीज तूं. मीहि पडतें.''
कांही दिवस गेले. दुधगांवच्या स्टेशनवर एक मुलगी उतरली.
''येथें भारत चित्रकलाधाम कोठें आहे'' तिनें टांगेवाल्याला विचारलें.

''आहे माहीत, बसा. तो रंगारी ना ? राममंदिरांत चित्रें काढणारा. फार छान चित्रें बघा. जो येतो तो बघायला जातो. ते आजारी आहेत म्हणतात. माझा पोरगा त्यांच्याकडून चित्रें आणतो. फार चांगला माणूस. बसा.''

टांगेवाल्यानें घराशीं टांगा आणला. ताईनें बाहेर येऊन पाहिलें. ती चकित झाली.
''कोण पाहिजे ?'' तिनें पुढें होऊन विचारलें.
''रंगा येथें राहतात ?''
''होय. या.''
सामान आंत आणण्यांत आलें. टांगा गेला. रंगा पडून होता. ती आलेली व्यक्ति एकदम रंगाजवळ जाऊन बसली नि रडूं लागली. अश्रु आंवरत ना.

''रंगा, काय रे होतें ? रंगा.''
''कोण, नयना ? तूं आलीस ?''
तो उठूं लागला. तो थरथरत होता. तिनें त्याला झोंपवलें. तो डोळे मिटून पडला होता. ती त्याच्या केसावरुन हात फिरवित होती. त्याला थोपटित होती. मध्यें ती वांकली. तिनें आपलें डोकें त्याच्या डोक्यावर ठेवलें.

''नयना, ये बाळ. रडूं नको. रंगा बरा होईल. तूं युरोपांतून कधीं आलीस ? मला काळजी वाटत होती. पत्र तरी पाठवायचें एखादें ?''

''मी पत्र पाठवलेलें मिळालें नाहीं ? फोटो पाठवले होते.''
''नाहीं मिळालें कांही.''
नयना उठून घरांत गेली. जणूं तिचेंच घर. दुपारचीं जेवणें झालीं. युरोपांतून आणलेलीं चित्रें ती रंगाला दाखवित होती. सुंदर फोटो होते. तिकडच्या हकीगती सांगत होती. रंगा ऐकत होता. सुनंदाहि खालीं चटयीवर बसून एकीकडे चरखा कातीत ऐकत होत्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel