''विश्वभारतींत ये नि माझ्याजवळ रहा. रंगाचे रंग खुलवीन. येशील ?''
''येऊं ? मी गरीब आहें''

''देवाची देणगी असलेला तूं श्रीमंत आहेस. ये मला आनंद होईल. दोनचार महिने तरी ये.''  रंगा सद्गदित होऊन निघून गेला. केळीं, भाजलेल्या शेंगा घेऊन तो आला. कढत दूधहि होतें.

''रंगा, तुमच्याकडे गायीचें दूध नाहीं. बंगालमध्यें म्हशीचें दूध पिणें निषिध्द मानतात.''

''तुमच्यासाठीं मी गायीचेंच आणीत असतों''
''ते खरें रे''

थोड्या वेळानें रंगा गेला. आतां अधिवेशनाला फार दिवस नव्हते. रात्रंदिवस काम होतें. सारें नगर उभें राहिलें. अपूर्व असें ते साधें सौंदर्य होतें. आज पंडितजी यायचे. त्यांची मिरवणूक होती. त्या पहा हजारों स्त्रिया दुतर्फा उभ्या आहेत, हात जोडीत आहेत. पंडितजीनीं रथांतून खालीं उडी मारली. त्यांनी मायभगिनींना वंदन केलें.

झेंडावंदनाचा दिवस उजाडला. सारें मैदान माणसांनी फुलून गेलें होतें. गांवोगांव हिंडत ती ध्वज-ज्योतिहि आली. पंडितजींच्या हातीं देण्यांत आली. आतां ध्वज फडकायला. पंडितजी दोरी खेंचित आहेत परंतु दोरी तुटली ! आतां ? इतक्या उंच कोण पुन्हां नेणार दोरी ? ७५ फूट उंच तो स्तंभ ! वर वेताच्या काठीसारखा बारीक होत गेलेला. कोण चढेल, कोण तोल सांभाळील ? एक दोघे चढले परंतु उतरले. परंतु तो पहा शिरपूरचा रजपूत वीर किसनसिंग. तो चढला वर. लाखों डोळे त्याच्याकडे होते. भारताचें जणूं भाग्य वर चढत होतें. त्यानें कप्पींत पुन्हां दोर अडकवला नि वीर खालीं आला. टाळ्यांचा कडकडाट थांबेना. जवाहरलालजीनीं त्याला हृदयाशीं धरलें, शंभर रुपये हातीं ठेवले. त्या बाळाला आज केवढी धन्यता वाटली असेल ! फैजपूरची फजीती न होतां फत्ते झाली. महाराष्ट्राची तेथें कसोटी होत होती.

आज रंगा लौकर उठला. आज गांधीजी सरहद्दगांधींसह आजूबाजूच्या खेड्यांमध्यें पायींच हिंडायला जाणार होते. स्वयंसेवक रस्ता सापच् करित होते. रंगानेंहि आज प्रेमानें हातांत झाडू घेतला. महापुरुषांना जाण्यासाठीं रस्ता स्वच्छ करण्यांत त्याला परम आनंद होत होता. कुंचला धरणारा रंगाचा हात आज केरसुणी घेऊन सौंदर्य निर्मित होता. स्वच्छता फुलवीत होता.

त्या पहा दोन अलौकिक विभूति आल्या. सभोंती मुलाबाळांची गर्दी. बादशहा खान आणि महात्माजी. जणूं पृथ्वीवर उतरलेले चंद्रसूर्य, हरिहरांची जणुं जोडी. एक उचं धिप्पाड, एक कृश लहान. परंतु दोघांचे आंत हृदय एकच.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to चित्रकार रंगा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
खुनाची वेळ
भारताची महान'राज'रत्ने
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय