तुला घेऊन कोठेंतरी गेलें असतें. नव्हती इच्छा देवाची. रंगा, मी तुला म्हणायची तुझ्या आत्म्याजवळ मी लग्न लावलें आहे. ते माझे शब्द खरे व्हावेत म्हणून का देह फेंकलास ? असो, तुझा आत्मा माझ्याजवळ असो. माझ्या जीवनांत रहा. माझ्या बोटांत येऊन बस. तुझी ती दिव्य कला ! दारिद्र्यांत नाहीं रे वाव ! इतर देशांत जन्मतास तर तुला डोक्यावर घेते. पुन्हां या गरीब महाराष्ट्रांत जन्मलास. ज्यांच्या कलेचा कोणी गौरव करणार नाहीं. कोण त्यांच्या संबंधीं इंग्रजींत लिहिणार ? प्रसिध्दिपराङ्मुख महाराष्ट्र ! येथें लहानमोठ्या कलाशाळा का थोड्या आहेत ? परंतु कोण त्यांना आधार देणार ? स्वराज्यांत तरी मिळेल का ? का कांही प्रान्त सारें बळकावतील ? भारतीय ध्येयांची उपासना ते ते प्रान्त करतील. सर्वांना संधि हवी, सर्वाना सहाय्य हवें. त्याहि वेळेस वशीले येतील का ? रंगा, स्वतंत्र हिंदुस्थानांतील पार्लमेंट तूं रंगवणार होतास ! स्वतंत्र हिंदुस्थानांत तरी पुढें तुला कोणी बोलावलेंच असतें याचा तरी काय भरंवसा ! कोणी तुझी दाद लावली असती, कोणी तुझी कला ओळखली असती ? म्हणून तूं गेलास ?''

नयना मध्येंच मोंठ्याने बोले. पुन्हां डोळे मिटून बसे. मध्येंच तिचे डोळे भरुन येत. अशा रीतीनें गाडींतून ती जात होती. वाटेंत तिच्या डब्यांत कांही स्त्रिया आल्या. परंतु गर्दी नव्हती. तिनें बॅगेतून रंगाचीं चित्रें काढली. ती त्यांच्याकडे पहात होती. पुन्हां तिनें ती ठेवून दिलीं. ती पेन्सिलीनें कांही काढीत बसली. स्टेशन आलें म्हणजे काढी. पुन्हां बंद ठेवी. नाशिकचें स्टेशन आलें. एक पारशी बाई मुलीसह डब्यांत चढली. नयना चित्र काढीत होती. ती मुलगी तिच्याजवळ येऊन बसली. तेथें खिडकी होती. मुलांना खिडकी हवी. त्यांना प्रकाश, हवा, बाहेरची विपुली सृष्टि हीं हवीं असतात. नयनाच्या चित्राकडे ती मुलगी बघत होती.

''जो जो मा, केटला सारु'' ती आनंदून म्हणाली.
''सारु तो छेज'' आई म्हणाली.
नयनाला त्या मुलीचें कौतुक वाटलें.
''तुला छान चित्रें दाखवूं ?''
''हां. चित्रकलामां मने बहुत रस छे.''
नयनानें रंगाचीं कांहीं सुंदर चित्रें दाखवलीं. तिनें स्वत:चींहि कांही दाखवलीं.''
''आ कोण चित्रकार ?''
''एनुं नाम रंगा''
''क्यां छे, क्यां रहे छे ?''
''प्रभूना घरे. पृथ्वी छोडी चाली गया''
''अरेरे, केटली सरस कला एनी हाथमां हती''
नयनाचें त्या दोघींना वेड लागलें.
''मुंबईमां आमारे त्यां आवजो. आ लडकीने शिखावजो. आमारे त्यां तमारी रहवानी पण सगवड करवामां आवशे. ना ना पाडजो. मणी, केम बेटी ?''
''सारु''
''तमारुं नाम ?''
''नयना''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel