रंगा, तुला एक गंमत सांगूं ? अरे अमानुल्ला नव्हता का अफगाणिस्तानचा राजा. त्याला शेवटीं पळून जावें लागलें. बच्चाइसाकूनें बंड केलें. परंतु नादीरशहानें त्या बंडाचा पाडावा करुन स्वत:च राज्यपद घेतलें. अमानुल्लाच्या बाजूच्या सरदारांना प्राणसंकट होतें. अमानुल्लाचा राजबिंडा तरुण मुलगा १५/१६ वर्षाचा. त्याला घेऊन कांही सरदार हिंदुस्थानच्या बाजूला यायला निघाले.   अफगाणिस्तानांतून ते बाहेर पडले. पोतीं भरभरुन त्यांनी रुपये बरोबर घेतले. बंदुका घेऊन त्या युवराजाला घेऊन निघाले. एक उंच पहाडावर त्यांचा मुक्काम होता. अमानुल्लाचा मुलगा दमून गेला होता. तेथें एक गुहा होती. गुहेंत तो राजपुत्र झोंपला. पाय गुहेंत होते. तोंड गुहेच्या तोंडाजवळ होतें. हवा स्वच्छ मिळावी हा हेतु. बरोबरचे सरदार झोंपले. परंतु हा कसला आवाज ? हा घोरण्याचा. तो राजपुत्र घों घों करुन घोरत होता. आणि दुसरा आवाज कोठून येतो ? एक फणाधारी महान् भुजंग वरच्या बाजूनें खालीं येत होता. त्याचा फणा खालीं होता. खालून राजपुत्र घोरण्याचे घों घों करीत होता. वरुन येणारा भुजंग पचें पचें करित होता. त्या सर्पाला वाटलें माझ्या राज्यांत हा दुसरा सर्प कोण ?

एक सरदार जागा झाला. त्यानें तें रक्त गोठून टाकणारें दृश्य पाहिलें. तेथें चर्चेला, विचाराला वेळ नव्हता. त्यानें बंदुक रोंखली. गोळी सूं करीत त्या फणेंतून गेली. साप मरुन पडला. फणेंतील रक्त राजपुत्राच्या अंगावर पडलें. तो उठला. तें रक्त पुसून टाकण्यांत आलें. केवढा प्रसंग !

रंगा, अशा रोमहर्षण कथा मला कोण सांगतें ? अरे अमानुल्लाचे जे लोक इकडे आले त्या सर्वांना ब्रिटिश सरकारनें राजबंदी केलें. नागपूर, रंगून इत्यादि ठिकाणीं त्यांना नजरकैदेंत ठेवलें. त्यांना दरमहिन्याला भत्ता देण्यांत येतो. जे सरदार इराण, तुर्कस्थान, इटली वगैरे देशांत गेले तेथें ते स्वतंत्र आहेत. परंतु ब्रिटिश अमानुल्लाचे शत्रु. त्यांना नादिरशहा जवळचा वाटतो. म्हणून नादिरशहाविरोधी लोकांना त्यांनी नजरकैद केली. हे लोक अति दु:खी आहेत. अफगाणिस्तानांत त्यांचीं मुलें बाळें, सगेसोयरे. परंतु कधीं चिठीचपाटी पाठवतां येत नाहीं: यांच्याजवळ संबंध आहे असा आरोप ठेवून तिकडील आपतांना गोळ्या घालायचे ! नेम नाहीं.

पेशावरलाहि असे कांही नजरबंदीलोक आहेत. ते मोठे लष्करी अंमलदार होते. एकजण रिसाल्यावरचा मुख्य होता. त्यांना मोटारींतून सायंकाळी फिरायला नेण्यांत येतें. एकेदिवशीं गंमत झाली. मी एकटाच फिरायला गेलों होतों. माझी जिवलग मैत्रीण बांसरी माझ्याजवळ होती. मी आतां छान वाजवतों बांसरी. संगीत हा मन शान्त करायला मोठा उपाय आहे. मी सायंकाळीं बांसरी वाजवित होतों. आसापासच्या दर्‍याखोर्‍यांत ते आवाज घुमत होते. मी तन्मय होतों. डोळे मिटलेले होते. थोड्या वेळानें मी डोळे उघडले. तों समोर एक अफगाण बसलेला. मी घाबरलों. पुंगी ऐकून नाग यावा त्याप्रमाणें का हा लालबुंद अफगाण आला ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel