''बघ हं विजया'' लता रागावून म्हणाली.
त्या सत्याग्रही मुली जरा गंमत करित होत्या.
''आज नको वर्ग, मला आज बरें नाहीं. तुम्ही जा, वाचा, वादविवाद करा'' नयना म्हणाली.
सर्व मुली गेल्या. लता तेथेंच बसली.
''कोण आलें होतें भेटायला नयनाताई ?''
''वडील''
''काय म्हणाले ?''
''माफी मागून सुटून ये''
''त्यांना घरीं कोणी नाहीं ?''
''ते एकटेच आहेत. माझ्यावर त्यांचा जीव. परंतु माफी का मागायची ? त्यांचे म्हातारपण आहे. मी त्यांच्या इच्छेविरुध्द सारें केलें. परंतु मी वाईट कांहीच केलें नाही. प्रभूला का माझें करणें आवडलें नाहीं ? त्यानें रंगाला कां न्यावें ? माझें हृदय शुध्द आहे. देवाला न आवडणारें मी कांहीहि केलें नाहीं. लता, तूं पुढें काय करणार ?''
''मी तुमच्या भारतचित्रकलाधामांत येईन. मी तेथें शिकेन.''
''लते, सारी स्वप्नें हीं. मला वाटे माझे वडील मुलींसाठी सारें देतील. त्यांतून संस्था काढूं. रंगाला आनंद वाटेल, त्याचा आत्मा फुलेल, देहासहि बरें वाटेल. परंतु सारीं स्वप्नें भंगली. रंगा गेला. त्याची ध्येयें मी कशीं प्रत्यक्षांत आणूं ? मी एक सामान्य स्त्री. लता, कोठें आहे भारतचित्रकलाधाम ? रंगाच्या खोलीवर पाटी होती. त्या लहानश्या जागेंत तो आपलें ध्येय फुलवित होता.''
''परंतु कधीं ती संस्था जर प्रत्यक्ष सुरु झाली तर मी येईन.''
''ये. मी तुझी वाट पाहीन.''
त्या दिवशीं रात्रीं नयनाला अद्भुत अनुभव आला. ती आपल्या कोठडींत एकटीच होती. रंगानें योजिलेल्या चित्रांपैकी एक ती तयार करित होती. एकाएकीं तिला संस्फूर्त वाटलें. आपल्यामध्यें कोणी तरी शिरत आहे असें वाटलें. आपल्या बोटांत कोणी तरी घुसत आहे असें तिला वाटलें. ती जरा बावरली, घाबरली. परंतु ओरडली नाहीं. तों काय आश्चर्य ? समोर तिला रंगा दिसला. ती बघत राहिली. ती त्याला भेटायला धांवली. कोठें आहे तो ? तो छायामय होता, स्वप्नमय होता. ती पुन्हां आपल्या आसनावर बसली. तिची जणूं समाधि लागली. तिला स्वत:चें भान जणूं नव्हतें. रात्रभर ती जागी होती. अपूर्व चित्र तिनें तयार केलें.