तो अफगाण उर्दू मिश्रित हिंदींत बोलूं लागला.
''घाबरुं नको. वाजव. मला आवडतें संगीत. माझा मुलगा बांसरी वाजवी. किती वर्षांत त्याची भेट झाली नाहीं. तो मोठा झाला असेल. तुझ्याएवढा असेल. वाजव बाळ, वाजव''
मी पुन्हां सूर आळविले. तो सरदार खुश झाला, उचंबळला. त्याच्या मोटारचें शिंग वाजलें.
''हम् कैदी हैं. कल आईए. यहां मै फिर आऊंगा'' तो हस्तांदोलन करुन गेला. त्याची मोटार गेली. अफगाण आणि प्रेमसिंधु ! परंतु रवीन्द्रनाथांनी काबुलीवाल्याची नाहीं का गोष्ट लिहिली ? वात्सल्य सर्वत्र आहे. प्रेम सर्वत्र आहे. त्या अफगाणाला आपल्या मुलाची आठवण झाली. मी विचार करित घरीं गेलों. आणि रंगा, दुसर्या दिवशीं मी पुन्हां तेथें गेलों. बांसरी वाजवित बसलों. आणि पों करित मोटार आली. प्रेमसिंधु अफगाणाला घेऊन ती आली. मोटार रस्त्यांवर थांबली. तो सरदार दौडत टेंकडीवर आला. त्यानें माझ्या मुखाचें चुंबन घेतलें. त्यानें मला हृदयापाशीं धरलें.
''बेटा, बजाव तेरी बांसरी'' तो म्हणाला आणि मी भावनामग्न होऊन बांसरी वाजवली. आम्ही दोघे दिकाल विसरलों. एका भावसिंधूंत आम्ही डुंबत होतों.
''अच्छा, बहुत अच्छा. जरा ठेरीये.'' मी थांबलों आणि किती वेळ गोष्टी बोलत होतों. तो म्हणाला ''तूं जा अफगाणिस्तानांत. मी चिठी देईन. द्राक्षें खा. लठ्ठ होऊन ये. मांडवावर द्राक्षें वाळत घातलेलीं असतात. आम्ही खिसे भरुन शाळेंत जायचे. अफगाणिस्तानांत वपत्रत जमिनी म्हणजे धर्माला दिलेल्या जमिनी खूप आहेत. तेथें हंगामांत तीन तीन महिने फकीर राहतात. पोटभर द्राक्षें खातात. त्यांनीं विकायला नेऊं नये.'' रंगा, द्राक्षांच्या १०८ जाती आहेत ! द्राक्षांचे अपार वैभव तिकडे आहे. आणि तो सरदार म्हणाला ''बेटा, अरे प्रेम पशुपक्षियोंमेंहि मौजूद है. हमारी बडी दादी थी. उसका हाथ हमारी गो पछानती, और वह उसकेपास जाती तो दो शेर जादा दूध देती.'' एकदां गाय दूध देतनाशी झाली. परंतु गांवाला गेलेली आजी आली नि ती पुन्हां दूध देऊं लागली. अफगाणिस्तानांत कोणी काळाबाजार केला तर त्याच्या कानांत खुंट्या ठोकतात ! व्रूच्र शिक्षा ! परंतु काळाबाजार करण्याची छाती नाहीं. किती तरी गोष्टी ते सांगत होते. एक गंमत सांगूं का ? पहाडांत एकेठिकाणीं परीस आहे अशी दंतकथा. चारचार महिने बकर्या पहाडांत चरायला नेतात. पुढें गुराखी त्याना घरीं परत आणतात. बकर्या पाठवतांना त्यांच्या खुरांना नाल मारतात. हेतु हा कीं परीस नालाला लागला तर नाल सोन्याचा व्हावा ! महिनेच्या महिने रानांत राहून जेव्हां कळप पुन्हां खालीं येतात, घरीं येतात तेव्हां जो तो बकर्यांच्या खुर्या बघतो. सोनें झालें आहे कीं काय ?