''रंगा, तूं आतां जा. दमला'' नंदलाल म्हणाले.
''तुमच्याजवळ काम करतांना कोण दमेल ? मी काम करतां करतां किती तरी मिळवित आहे. ग्रामीण वस्तु घेऊनच तुम्ही सौंदर्य-समुद्र निर्माण करित आहांत. तुम्ही परवां म्हणालांत कीं कला सर्वांच्या जीवनांत आहे. परंतु असें कोठें येतें प्रत्ययास ?''
''रंगा, कलेचा शेवटीं अर्थ काय ? कला आनंद देते. कला परिस्थितीवर स्वार होते. अरे एखादा गरीब मनुष्य घे. तो गरीब असला तरी कुडाच्या भिंतींना गेरुचा रंग देईल. त्या शेणानें सुंदर सारवील. घरासमोर चार झेंडूचीं फुलझाडें लावील. घरांतील मडकींच, परंतु त्यांना पांढरा तांबडा रंग देईल. त्या दारिद्र्यांतहि कलेनें तो सुंदरता आणतो. आपल्या बायका अंगण सारवतात. मग तेथें कमळ, तारें, चंद्र, सूर्य काढतात. याचा अर्थ काय ? ती गरीब स्त्री म्हणते ''स्वर्ग माझ्या अंगणांत आहे. ते चंद्रसूर्य येथें आहेत. ती कमळें, ते तारें-सारें सौंदर्य माझ्या या झोपडीसमोर आहे.'' रंगा, आणि खरें सांगूं का मानवांतील कलात्मता प्रकट व्हायला त्याला फुरसतहि हवी. मनुष्याला निरनिराळे आनंद का नको असतात ? सर्वांत मोठा आनंद नवनिर्मितीचा असतो. परंतु सारी जनता कांही तरी नवीन निर्मित आहे असें कधीं होईल ?''
''समाजरचनाच बदलेल तेव्हां. माझे वासुकाका एकदां असेंच म्हणाले होते. आजची कला ही मूठभर लोकांची. आजची संस्कृतिहि मूठभर लोकांची. श्रमणारी सर्व जनता का कलाविकासांत भाग घेत आहे ? त्यांना ते आनंद जणूं माहीतच नाहींत. म्हणून त्यांची सारी शक्ति दोनच गोष्टी निर्माण करण्यांत जाते. श्रम करणें आणि मुलें निर्माण करणें. मुलें ही त्यांची जणुं कलाकृति. ही कलाकृति तुच्छ नाहीं. सुंदर मूल जगाला देणें ही थोर सेवा आहे. शेतें हिरवीगार करणारा आणि राष्ट्राला मुलें देणारा शेतकरी हाहि कलावानच आहे. परंतु त्याला इतर आनंद मिळाले असते तर ? त्याची सर्जनशक्ति त्यांत खर्च झाली असती. त्यानें साहित्य निर्माण केलें असतें; त्यानें संगीताचा अभ्यास केला असता; त्यानें दुर्बीण घेऊन आकाशाकडे पाहिले असतें. तो शास्त्रसंशोधन करता. मनुष्याची सर्जनशक्ति या अशा अनेक नादात रंगली म्हणजे मग मुलांबाळांचे लेंढारहि कमी होईल. कारण सर्जनशक्तीला अन्यत्र वाव मिळेल. मी मनांत येईल तें बोलत आहें. परंतु माझ्या मनांत असे विचार येत असतात.''
''असाच विचार करणारा हो. परंतु रंगा असें नको समजूं कीं श्रमणार्यांजवळ संस्कृति नाहीं. त्यांच्याजवळ सुंदर नाच असतात. सुंदर लोकगीतें असतात. भजनी मंडळें असतात. बांबूची बांसरी वाजवून सारें रान नादमय करतात. संस्कृति म्हणजे केवळ सुखविलास नव्हे. दहा सुखांची यादी नव्हे. शेतकर्याजवळ प्रेम असतें. आतिथ्य असतें; तो सुसंस्कृत नाहीं असें कसें म्हणतां येईल ? नवीन साधनें त्यांच्या झोंपडीपर्यंत जाऊं नयेत असें नाहीं माझे म्हणणें. परंतु आपण व्यापक दृष्टीनें विचार करायला हवा. मी तर मानतों कीं त्याला अधिक विश्रांति नि फुरसुत मिळायला हवीत. गुरुदेव म्हणायचे कीं सारी संस्कृति फुरसुतीच्या वेळेस निर्माण होते. पोटापाण्याचे उद्योगच रात्रंदिवस करावे लागणार असतील तर संस्कृतिसंवर्धनासाठीं कोठला वेळ ?