जगांत तर युध्द पसरत चाललें होतें. रशियावर जर्मनीनें अचानक हल्ला केला. इकडे जपाननें तेंच केले. हिंदुस्थानवर संकट येणार असें वाटलें. हिंदुस्थाननें मुक्त झालेंच पाहिजे असें महात्माजींना वाटलें. तडजोडी निफळ झाल्या. आणि तो महान् चलेजाव स्वातंत्र्यसंग्राम सुरु झाला. नयना आठ ऑगस्ट १९४२ च्या काँग्रेसच्या सभेला गेली होती. राष्ट्रपित्याचें तें अडीच तास चाललेलें भाषण तिनें ऐकलें. ती घरीं निराळी होऊन आली.

''नयनाबेन, कोठें गेली होतीस ?''
''काँग्रेसच्या सभेला. मी महात्माजींचे भाषण ऐंकलें. देशासाठी मरावें असें मला वाटत आहे.''

''म्हणजे काय करणार ?''
''आपण स्वतंत्र म्हणून वागूं लागायचें. ब्रिटिश सत्ता संपली, ती मानूं नका, असें पुकारीत जायचें. येथील गव्हर्मेंट हाऊसवर राष्ट्राचा झेंडा लावायचा. गोळीबार झाला तर मरायचें. गुलाम म्हणून राहणें पाप आहे मणी.''

रात्रीं नयना निजली नाहीं. ती चित्रें रंगवीत बसली. ब्रिटिशांच्या अन्यायाचीं चित्रें. सकाळ झाली. तों बातमी आली कीं सारे राष्ट्रपुरुष गिरपच्दार केले गेले म्हणून. आणि ज्वलंत बातम्या येऊं लागल्या. सारा देश उठावला. ब्रिटिश सत्ता हादरली. ठायीं ठायीं टापू स्वतंत्र होऊं लागले. भारतमातेचीं मुलें बेफाम झालीं. मरणाचा डर उडाला. तो पहा बिंदु नारायण, तो शंकर, तो नारायण, तो शिरीष, ती तरुलता, तो युसूपच्, तो हेमू, तो वसंत, तो विष्णु-लहान लहान भारतमातेचे चिमणे बाळ ! मृत्यूला वरित होते. नयना वार्ता ऐके. गंभीर बने. अष्टीचिमूरच्या कथा तिनें ऐकल्या. ती नागिणीप्रमाणें चवताळली. त्या रात्रीं तिनें पाशवी अत्याचार म्हणून चित्र रंगविलें. लिथोवर गुप्तपणें तिनें हजारों प्रती करुन घेतल्या. ती पहाटे उठली. मणीला तिनें पत्र लिहून ठेवलें.

प्रिय मणी,
कदाचित् मी पकडली जाईन किंवा मारली जाईन. माझी बॅग दुधगांवला पोंचवा. तुम्हीं प्रेम दिलेंत, मी विसरणार नाहीं. भेटणें शक्य होईल तेव्हां भेटेन.''

तीं चित्रें घेऊन गाणें म्हणत ती निघाली. ती चित्रें वाटीत होती. गाणें म्हणत होती. ते पहा पोलीस आले. तिच्या हातांतील चित्रें हिंसकून घेण्यांत आलीं. लोकांवर लाठी हल्ला झाला. नयनाला तुरुंगांत स्थानबध्द करुन ठेवण्यांत आलें. तिनें बापुसाहेबांना, सुनंदा आईला, मणीला पत्रें लिहिली. ती तुरुंगांत आनंदानें होती. तेथें तिनें चित्रकलेचा वर्ग सुरु केला. रंगाच्या उरलेल्या कल्पना ती तेथें रंगवूं लागली.

आबासाहेबांनी नयनाला अटक झाल्याचें वाचलें. सरकारदरबारीं त्यांचें वजन होतें. नयना माफी मागती तर ती सुटती. ते तिला भेटायला गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel