''तुम्हांला लाज नाहीं वाटत पुन:पुन्हां असें बोलायला ? आपला संसार आठवा. किती प्रेमानें मी तुमचें सारें करी. लिली, हा तुमच्या माझ्या जीवनांतील आनंद. परंतु रंगामुळें तुम्ही संशयी झालांत. मला भाऊ नाहीं कोणी नाहीं. माहेरचें कोणी नाहीं. आम्हां बायकांचें हृदय कळतें का तुम्हांला ? तो मुलगा शेजारीं आला. घरची गरीबी. त्याची आई नाहीं. बाप तर लहानपणीच गेला. हो हातानें स्वयंपाक करी. लिलीला फिरायला नेई. मित्र येणार म्हणून पहाटे उठून पुरणपोळी करणारा. मला त्याचें कौतुक वाटे. त्याला कधीं भाजी द्यावी, चटणी द्यावी. शेजारधर्म म्हणून असतो. बहीणीला भाऊ हवा असतो. तो मला दिवाळीला एक चित्र भाऊबीजेची ओंवाळणी म्हणून देणार होता. रात्रंदिवस काम करी, तो थके. आजारी होता त्या दिवशीं. त्याच्याजवळ नको का जरा बसूं, नको का धीर देवूं ? तुमची मनेंच पापी; संशयखोर. जेथें तेथें तुम्हांला विषयवासना दिसते. किडे मेले. आणि तुम्हीं. पाप्यांनी आम्हांला येतां जातां बोलावें ? तुम्ही का जीवनांत निर्मळ आहांत ! मी समजा पापिणी, दुसर्‍यावर प्रेम करणारी. तुम्ही सर्वस्त्रियांकडे माता म्हणूनच बघतां ना ? कधीं दुसरी भावना नाहींना मनांत आली ! बोला, स्पष्ट बोला.''

तिचें बोलणें ऐकून तो थंडगार झाला. कधीं न बोलणारी बायको फाडफाड बोलूं लागली. तो जरा भ्यायला, जपून वागूं लागला. घरांत आतां दोघांचा अबोलाच असे. कांही दिवस गेले. एके दिवशीं तो कचेरींतून आजारी होऊन आला. घरीं येऊन आंथरुणावर पडला. तिनें कांहीं विचारलें नाहीं.

''चहा दे थोडा करुन'' तो म्हणाला. तिनें कपभर नेऊन दिला. तो पडला. परंतु तिनें तापबीप आहे का पाहिलें नाहीं. रात्र झाली. तिनें स्वयंपाक केला.

''पान वाढूं का'' तिनें विचारलें.
''तापानें मरतों आहें आणि पान वाढूं का विचारतेस ? तूं आहेस कोण हडळ ? चांडाळीण ?''

''तुम्ही कोण आहांत समंध, पिशाच ? माझ्या मांडीवर लिली तापानें फणफणलेली असे. तरी तुम्ही कचेरींत विडा चघळीत जात असां ? तिचा देह कचरा उचलावा तसा उचललात नि नेलात. आल्यावर राक्षसाप्रमाणें जेवलेत ? तुम्ही कोण ? कोणती तुमची जात ? बोला. आतां का दांतखिळी बसली ? मी आतां पोटभर जेवतें. मला काय म्हणून तुमच्याविषयीं कांहीं वाटेल ? माझें रंगावर ना प्रेम ? तुमच्यावर नाहीं ना ? तुम्ही परपुरुष ना ? तुमच्या अंगाला हात लावून ताप आहे कीं नाहीं कसें बघूं ? हा हात का तुम्हांला आवडतो ? या हाताला तुम्ही टांचण्या टोंचल्यात. रंगा तुझ्या हातावर चित्रें काढी असें म्हणून या तळहाताला टांचण्या टोचल्यात आठवतें का ? का मेली स्मृति ? मी चित्र काढित होतें, हाताला रंग लागला म्हणून सांगितलें. परंतु तुम्हांला कावीळ झालेली. माझें बोलणें खोटें ! पडा फणफणत तापानें. त्या मुलीला मारलेंत. भाऊभाऊ तापांत म्हणे तर तिच्या थोबाडींत मारलीत ! मला चांडाळीण म्हणतां ? आपण कोण ? मी आज चांडाळीण असेन तर ती तुम्ही बनवलीत. मी मूळची तशी नव्हतें. तुमच्या दुष्टपणान मला आकार दिला आहे. तुमच्या संगतीनें मीहि चांडाळीण बनलें. जें पेरावें तें उगवतें. माझ्या जीवनांत निखारे कांटे पेरलेत. आतां खा निखारे नि कांटे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel