''शेवटचे दोन शब्द मला त्यांना सांगूं दे.''
''येथें शाळेंत नको.''
''सांगा, सांगा.'' मुलें गर्जलीं.
''मी त्यांना दोन शब्द सांगणार आहें. तुम्हांला करायचें असेल तें करा. वाटलें तर पोलीस बोलवा.''
असें म्हणून वासुकाकांनी शेवटचे चार शब्द मुलांना सांगितले :
''प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रेमानें मला निर्भय केलें आहे. शाळाप्रमुखांनी मला क्षमा करावी. मुलांनो, मी दुसर्या कोठल्या तरी शाळेंत जाईन. येथें तुम्हांला देत असें ते नवीन मुलांना देईन. तेथूनहि कदाचित् मला हांकलतील. कारण आजकाल शिक्षणसंस्था जात्यंधतेचे अड्डे बनत आहेत. तुम्हां सर्वांना संकुचित, व्देषी, मत्सरी बनवण्याचे प्रयत्न चालले आहेत. तुम्ही हें विष पचवून मृत्युंजय बना. राष्ट्राला प्रेमाचें अमृत द्या. सारे धर्म, जाति एकत्र नांदवायचा प्रयोग आपणांस करायचा आहे. भेदांत अभेद पहायचा आहे. तुम्ही विचारानें, भावनेनें मोठे होत जा. सुखी होण्याचा एकच मार्ग आहे. उत्तरोत्तर वाढत जाणें, नवीन नवीन शिकणें, नवीन नवीन मैत्री जोडणें. तुम्ही उर्दुहि शिका. ती लिपी शिका. ईजिप्तपासून जावापर्यंतच्या अनेक देशांत तीच लिपी आहे. या देशांशीं उद्यां स्वतंत्र झाल्यावर तुम्हांला संबंध जोडावे लागतील. इंग्रजी शिकण्यांत जसें पाप नाहीं तसें शेजारच्या भावांची, शेजारच्या देशांची भाषा शिकणें पाप नाहीं. त्यांच्या भाषा शिकणें हा शेजारधर्म आहे. कोणी चिनी शिका, रशियन शिका. उत्तरोत्तर पुढें जा. नवभारत तुम्हांला निर्मायचा आहे. मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. मी तुम्हांला किती सांगूं ? थोडी तों गोडी''- त्यांचा आवाज सकंप झाला. एका मुलानें केव्हां हार आणला जाऊन कोणास कळे ? त्यानें तो हार घातला. वासुकाका मुलांजवळ बोलत शाळेबाहेर पडले.
''बेशिस्त मनुष्य'' संतापानें प्रमुख ओरडलें व निघुन गेले. वासुकाका घरीं आलें. रंगा, सुनंदा वाट पहात होती.
''काका, उशीरसा ?''
''रंगा, आतां दुसरी नोकरी शोधायला हवी. मला शाळेंतून काढून टाकलें.''
''कां ?''
''मी मुलांना नवजीवन देतो म्हणून. थोर विचार देतों म्हणून. व्देषमत्सराऐवजीं सहानुभूति नि संयम शिकवतों म्हणून. संकुचित दृष्टि न देतां विशाल दृष्टि देतों म्हणून.''
''आतां ?''
''आतां अर्ज लिहित बसायचें. महाबळेश्वर आतां येथेच. सुटीचा पगारहि आतां मिळणार नाहीं.''