एका भल्या मोठ्या वाड्यांतील एका लहानशा खोलींत काशी नि तिचा बाळ रंगा दोघें रहात होती. रखमाबाईंची तिला मदत मिळाली. त्या वाड्यांतील एक दोन घरचें कामहि तिला मिळालें.
''काशीबाई, तुम्ही हळद द्याल का कुटून नि दळून ? आधीं कुटायला हवी, मग दळायला वही.''
''मला एकटीला जातें ओढेल का ?''
''तुम्ही कुटून ठेवा. आपण दोघी मिळून दळूं.''
''किती तुमचे उपकार. देव तुमचें भलें करो.''
''आणि ही रंगाला गुळपापडीची वडी ठेवा. मिळाली होती अंबुताईकडे. म्हटलें रंगाला होईल. गेला कोठें ? खोडसाळ आहे तो तुमचा रंग. परवां मला म्हणाला हें बघा तुमचं चित्र काढलें आहे. मला हंसता पुरेवाट झाली. उद्यां देईन हळद आणून.''
रखमाबाई अशीं अवांतर कामें आणीत. दोघीजणी सहकार्यानें करीत. मीठ वांटणें, मिरच्या कुटणें, हळद दळणें, भाजणी करणें, मसाला कुटणें, पापड घालणें, नाना कामें असत. भांडी नि धुणीं दोन तीन ठिकाणी होतींच. कधीं रंगाहि आईला मदत करायचा. मायलेकरांचे दिवस कष्टांत परंतु समाधानांत जात होते.
त्या वाड्यांत एक शिक्षक रहात होते. त्यांना वासुकाका म्हणत. तिशीपस्तिशीच्या वयाचे होते. त्यांच्या पत्नीचें नांव वासन्ती. त्यांना मूलबाळ नव्हतें. वासुकाकांकडे कितीतरी मुलें यायचीं, जायचीं. कोणाला वाचायला पुस्तक देतील, कोणाला गणित सांगतील, कोणाला रागें भरतील, असें चालायचें. रविवारीं ते मुलांना गोष्टी सांगत. कधीं ते मुलांना खायला द्यायचे, खाऊ द्यायचे. त्यांच्या खोलींत तीन तसबिरी होत्या. लोकमान्य, जवाहरलाल आणि गांधीजी. या तीन थोर पुरुषांच्या त्या होत्या. हीं वासुकाकांची दैवतें. त्या त्या दैवताचा वाढदिवस खोलींत साजरा होई. वासुकाकांची ती प्रशस्त खोली म्हणजे नवभारताच्या निर्मितीची जागा होती. नवीन पिढी तेथें तयार होत होती. थोर विचार घेणारी, व्यापक दृष्टि ठेवणारी नवीन पिढी.
वासुकाकांचे लक्ष रंगाकडे गेलें. एकेदिवशीं रंगा नळावर होता. तेहि होते. रंगाला बालदी उचलत नव्हती. आईनें पाणी भरुन ठेवायला सांगितलें होतें.
''इतकी कशाला भरलीस ? अर्धीं न्यायची. थांब. मी नेऊन देतों.''
''तुम्ही कशाला ? मी नेईन. टेंकित टेंकित नेईन.''
परंतु वासुकाकांनी ती बादली उचललीच. रंगाच्या खोलींत त्यांनी ती नेऊन ठेवली. त्यांनी खोली पाहिली. भिंतीवर चित्रें होती. तेथें रंग होते. खाली जमिनीवर चित्रांची वही होती.