''मी त्यांची पत्नी उरल्यें नाहीं. त्यानींच माझें तुझ्याशीं लग्न लावलें. कशाला काढतोस त्यांचें नांव ? परंतु काढ. त्यांनींच ना तुला माझ्या जीवनांत रंगवलें. तेहि महान् चित्रकार. तूं कुंचल्यांनी रंगवतोस, ते टांचणीनें रक्ताच्या रंगानें रंगवीत. अमृतराव, होय, ते महान् चित्रकार होते. तुझी मूर्ति माझ्या जीवनांत अनंत रंगांनी भरणारे चित्रकार ! त्यांना माझे प्रणाम. रंगा, माझी इच्छा पूर्ण कर.''

''अशक्य. मी तुझा भाऊ तो भाऊ.''
''मी तुझी राणी आहे. तूं माझा राजा. तूं माझा प्रियकर, मी तुझी प्रिया. तूं गोपाळ, मी राधा. तुझें माझें आतां निराळें नातें. सर्व रीतीनें एकरुप होण्याचें नातें.''

''तूं सुनंदाकडे जा.''
''तिची सून म्हणून जाईन. आपण दोघें जाऊं. त्यांचे आशीर्वाद घेऊं. मी त्यांची सेवा करीन. तुझा आनंद तो माझा. परंतु मी तेथें तुझी म्हणून राहीन.''

''माझी बहीण म्हणून, ताई म्हणून.''
''नाहीं, तुझी प्रेममयी पत्नी म्हणून, तुझ्या जीवनाशीं एकरुप झालेली तुझी जीवनसखी म्हणून, सहधर्मचारिणी म्हणून.''

''ताई, काय हें बोलतेस ? तूं मला काय समजतेस ? मी का असा छचोर, थिल्लर बनूं ? उथळ, भ्रष्ट बनूं ? मी जर तुझा भाऊ असेन तर हें तुला करुं देणार नाहीं. तुझ्यावर निराळे संस्कार झाले. माझ्यावर नाहीं झालेले. एका क्षणांत का भावाचा पति होतो ?''

''मी वाट बघेन. चार वर्षांनी हो. माझ्यावर 'तूं रंगाची आहेस, रंगाची आहेस असे घाव घालून त्यांनीं मला हा नवीन आकार दिला. मीहि तुला नवीन आकार देईन. तूं माझा आहेस, भाऊ म्हणून नाहीं, पति म्हणून आहेस, जीवनाचा स्वामी आहेस, असें मी सारखें तुला ऐकवीन नि तुला रंगवीन.''

''मी तुला म्हणत जाईन 'तू माझी ताईच आहेस. माझी बहीण.' हा तुला क्षणभर भ्रम झाला आहे. तुझें माझें खरें नातें बहीणभावाचें. ती लिली काय म्हणेल ? ती मला भाऊ म्हणे. प्रथम मामा म्हणे. पण तूं तिला भाऊ म्हणायला लावलेंस. तो भाऊ शब्द तुला आवडे. तुला भाऊ नाहीं, मला बहीण नाहीं. तें नातें किती थोर, किती निर्मळ ! मी माझी इच्छाशक्ति तुझ्यावर लादीत जाईन. माझी इच्छा विजयी होईल कारण ती पवित्र आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे. तुझ्या मनावर आलेलीं हीं अभ्रें जातील. आंतील शुध्द चंद्रमा शोभेल. तूं सध्यां दुधगांवला जा. सुनंदाआईजवळ रहा.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel