नाताळांत अधिवेशन भरणार होतें. पावसाळ्यांतच कामाला सुरुवात झाली. खान्देशांतील स्वयंसेवक गांवोगांव जाऊन प्रचार करुं लागले. त्या बघा खान्देशांतील राष्ट्रप्रेमानें उचंबळणार्या तरुण मुली. कांहींचे विवाह झालेले आहेत, कांहींचे नाहीं. हातांत झेंडे घेऊन, गाणीं गात गांवन् गांव जागा करित जात आहेत. त्यांच्या पायांत पादत्राणें नाहींत. का बरें ? भारतमातेचा संदेश पोचवण्याचे पवित्र काम होतें तें. ती जणुं थोर यात्रा होती. पायांत कसें घालायचें ? त्या तरुणींच्या पायांना फोड आले. कांहीनीं चिंध्या गुंडाळल्या. आणि प्रचार चालू ठेवला. परंतु दुसरेच प्रश्न उभे राहिले. ज्या मुलींची लग्नें झालेलीं होतीं, त्यांच्या पतिराजांकडून खरमरीत पत्रें येऊं लागलीं. परंतु त्या मुली ऐकत ना. ''हें राष्ट्राचें कार्य आहे. फैजपूरचें फझितपूर होतां कामा नये. या खेड्यांतील अधिवेशनास लोक येतील कीं नाहीं याची शहरी लोकांस शंका आहे. आम्हीं जनतेंत, चला चला, अधिवेशनाला चला, म्हणून प्रचाराचा पाऊस पाडला पाहिजे. अधिवेशन यशस्वी झाल्यावरच आम्ही घरीं येऊं.'' अशीं पत्रें त्या तरुण मुलींनी आपापल्या पतींना लिहिलीं. कांही यजमानांनी सोडचिठ्ठी दिली. मुली डगमगल्या नाहींत. त्या म्हणाल्या ''दुसरा राष्ट्रप्रेमी कोणी आम्हांला वरील. न कोणी भेटला तर राष्ट्राची सेवा करित संन्यासिनी म्हणून राहूं.'' त्या तरुणींचा निर्धार, त्यांचे तें तेज अपूर्व होतें. पुन्हां त्या मुली फार शिकल्यासंवरलेल्या नव्हत्या. पदवीधर नव्हत्या. परंतु म्हणूनच त्यांचा आत्मा अधिक निर्मळ होता.
पाऊस पडेना. शेतें कोरडी. पीक जळून जाऊं लागलें. राष्ट्रसभेचा व्देष करणारे म्हणूं लागले ''या काँग्रेसचे पांढरे पाय येथें आले म्हणून पावसानें दिला गुंगारा.'' वाटेल त्यानें वाटेल तें बोलावें. सरकार धार्जिण्या श्रीमंतांना खेड्यापाड्यांतून निर्भयतेचें, नव विचाराचे वातावरण जाणें नको होतें. त्यांनी अधिवेशनाला जागा मिळूंनये म्हणून खटखटी केल्या. विहिरींचे पाणी दोषी व्हावें व सरकारी परवानगी मिळूं नये म्हणून डुकरें मारुन पाण्यांत टाकलीं. पाणीच पुरणार नाही लाखों लोकांना म्हणून शंका निघाल्या. परंतु ती पहा एक धीरगंभीर विहीर. रात्रंदिवस इंजिन लावून पाणी उपसण्यांत येत आहे. परंतु तें कमी होत नाही. अपार पाणी. विनोबाजीनीं त्या विहिरीचें नांव सत्वशीला असें ठेवलें. त्या अडचणींत सर्वांना धीर द्यायला विनोबाजी वर्धा सोडून तेथें येऊन राहिले आणि पाऊसहि आला. परंतु इतका आला कीं शेतांतून पाणीच पाणी. मंडपाचें, शहर-रचनेचें सामान तरंगू लागलें. आतां हें पाणी कधीं वाळणार ? केलेलें सारें काम पाण्यांत गेलें. परंतु पावसामुळें फायदा झाला. धूळ घट्ट दगडासारखी बसली. पुन्हां काम सुरु झालें. मोठ मोठे पुढारीहि बल्ल्या, वासें उचलित आहेत. नवीन स्फूर्ति, नवा जोम. राष्ट्रसभेचें नगर उभें राहूं लागलें. ते पहा हजारों बांबू येऊन पडले आहेत. त्या बांबूंतून भव्य नगर उभें करायचें होतें.
त्या झाडाखालीं कोणाची तीं मूर्ति ? साधी मूर्ति. तेच नंदलाल. रवीन्द्रनाथांच्या विश्वभारतींतील महान् कलाकार. ते सूचना देत आहेत, नकाशा करित आहेत. शेंकडों बुरुड कामाला लागले आहेत. बांबूंच्या झिलप्या काढून सुंदर वस्तु विणीत आहेत. आणि तिकडे नगर, गोपूर उभें राहत आहे. भारतीय नि ब्रम्ही सौंदर्याचें तेथे मिश्रण होतें. चीनमध्यें ब्रम्हदेशांत मोठमोठ्या गोपुरांचे जसे प्रकार असतात, त्यांची छटा त्या नगर रचनेंत दिसत होती.