''तूं बाबांना बाबा नाहीं का म्हणत ?''
''त्यांचे नांवच बाबा. आई तर त्यांना कांहींच हांक मारीत नाहीं. मी लहान म्हणून त्यांना बाबा म्हणतें. भाऊ, आई काय रे हांक मारित असेल ? मी विचारलें आईला, तर म्हणाली वेडी आहेस हो तूं लिले. भाऊ मी वेडी का रे ?''
''तूं फार शहाणी''
''म्हणजे वाईट ना ? मी नाहीं बोलत जा. फू तुझी गट्टी. भाऊ, फू गट्टी''
लिलीची आई रंगाला कधीं भाजीं द्यायची, चटणी द्यायची. या मुलाचें, या तरुणाचें तिला कौतुक वाटे. रंगालाहि ताईची ओढ असे. लिली तर अक्षै रंगाच्या खोलींतच असायची. लिले, आतां घरीं जा, मला खोली बंद करायची आहे, असें शेवटी तो म्हणे.
असे दिवस जात होते. एके दिवशीं रंगाला पत्र आलें. कोणाचें पत्र ? तें पंढरीचें प्रेमळ पत्र होतें. तो पुण्याला मिलिटरी हिशेबखात्यांत मागेंच नोकरीला लागला होता. त्याची बदली एकदम पेशावरकडे झाली होती. तो लांब जाणार होता. मुंबईला येऊनच पुढें जायचें. रंगाकडे तो उतरणार होता.
''लिलीच्या आई, मला तुमचा पाटावरवंटा रात्रीं देऊन ठेवा बरं का.''
''कशाला रे भाऊ ?''
''मोठा बेत आहे. उद्यां लिलीला माझ्याकडे आमंत्रण.''
''पुरणपोळी करणार आहेस वाटतें ?''
''हो. पंढरीला फार आवडते. तो येणार आहे उद्यां. पेशावरला जायचा आहे. तो माझ्यासारखाच आहे. परंतु देवाच्या दयेनें मला काका, काकू, लिलीची आई, अशीं माणसें भेटतात. पंढरीला कोणी नाहीं.''
''त्याला तूं आहेस. तुला येते पुरणपोळी ?''
''हो. आईनें मला सारें शिकविलें आहे. किती छान पुरण भरतोस आई म्हणायची.''
''मी देईन तुला करुन.''
''माझ्या मित्राला माझ्या हातची पुरणपोळी देण्यांत निराळीच गोडी आहे. नाहीं का लिलीच्या आई.''