प्रणाम करुन नयना गेली. ती राजघाटावर गेली. पवित्र यमुनेच्या तीरावरील महापुरुषाची ती दहनभूमि तिनें पाहिली. तिचे अश्रु थांबतना.

''बापू, दधीचीचीं हाडें देवांचा सांभाळ करती झालीं. तुमची रक्षा सर्व नद्यांत, कैलासांत मानससरोवरांत, समुद्रांत सर्वत्र सोडली गेली. तात, ती रक्षा, ते मांगल्याचे कण भारताला सांभाळोत. आम्हांला प्रेमानें रहायला शिकवोत ! तिनें मस्तक ठेवलें. उठली. त्या बिर्लाभवनांत गेली. जेथें महापुरुषाचें रक्त सांडलें तेथें डोळे मिटून उभी राहिली. आणि बापूंचा चष्मा, त्या खडावा, ती माळ, जेवण्याचा कटोरा, सारें पाहिलें. सजल नयनांनीं ती परतली.

'आई कृतार्थ होऊन आलें.''
''तूं पुण्यवती सती आहेस.''
कांहीं दिवस गेले. अमेरिकेंतील कोट्याधीशानें तो चित्रसंग्रह दहा लाखांना मागितला. परंतु नयनानें कळविलें ''तो भारताचा वारसा आहे.''  तिची ती तार वाचून पंडितजी उत्तरले ''महामना स्त्री.''

''तुमच्या संस्थेला हिंद सरकारची पांच लाखांची देणगी. पुढें वार्षिक देणगी मिळत राहीलच.''

पंडितजींची तार आली. नयनानें देवांसमोर मस्तक नमविलें.
दुधगांवला राममंदिराजवळ भव्य इमारत होत आहे. मोठें आवार घेतलें आहे. तें राममंदीर मध्यवर्ती होणार. समोर नदी. तो तिकडे डोंगर. तो धबधबा. निसर्गरम्य स्थान !   

हैदराबादचाहि प्रश्न संपला. हिंदसरकारनें पचैजा पाठवल्या. मुक्तिफौजा. दुरावलेली जनता हिंदी जनतेस मिळाली. ग्रहण सुटलें. भारताचें तोंड फुलूं लागलें. पंडितजी म्हणाले ''ठेंचाळायचे दिवस संपले.  महात्माजींची शिकवण तारील.''

नयना आनंदली होती. भव्य इमारत पुरी झाली. अमेरिकेंतून चित्रसंग्रह परत आला. लाखरुपयाचा चेक आला. मणीच्या आईच्या मित्रानें एक लाखांची देणगी दिली. हिंदसरकारचे पांच लाख. प्रान्तिक सरकारनें एक लाख दिले. महाराष्ट्रांतील जनतेनेंहि दोन लाख लहान मोठ्या रकमांनीं गोळा केले. दहा लाखांची विश्वस्त योजना झाली. नयनाच तेथें प्रमुख. इमारतींत चित्रें लावण्यांत आलीं. इमारत सजली. वर तिरंगी झेंडा फडकत होता.

रामनवमीच्या दिवशीं इमारतीचें उद्धाटन व्हायचें आहे. पंडितजी येणार आहेत. अपूर्व सोहळा होईल. लाखों लोक जमतील. मणि आली आहे. पंढरी, ताई आलीं आहेत.

''नयना, आणखी काय हवें ?''
''ही परंपरा वाढो. या संस्थेंतून नवनिर्मिति होवो. कला सर्वांची होवो. कलाविकासांत सारी जनता भाग घेवो. येथें गरीब श्रीमंत येतील. मी त्यांची सेवा करणारी. येथें सारीं भारताचीं लेंकरें. सारीं एकत्र राहतील, रंग भरतील. भारताचें जीवन कसें रंगवायचें, भरायचें तें जनतेला चित्रव्दारा दाखवतील. आम्ही चित्रें काढूं, स्लाइड्स करुं, गांवोगांव जाऊं. कलेचा प्रचार करुं. कला हृदयें जोडील. नवभारत निर्मायला हातभार लावील.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel