तो हळूच उठला. ती त्याला वर घेऊन गेली. अनंत तारें चमचम करित होते.
''आज अमावास्या कीं काय ?'' त्यानें विचारलें.
''असेल बहुधा'' ताई म्हणाली.

''मला पुनवेपेक्षां अमवास्या आवडते. गंभीर वाटते. पौर्णिमेला चंद्राचें तें पिठासारखें चांदणें. परंतु अमावस्येला अनंत तारकांची द्युति चमचम करित असते. प्रत्येक कण तेजोमय आहे. अणुअणूंतहि अपार शक्ति आहे, अपार वैभव आहे. अमावस्येलाच सारे पूर्वज, सारे पितर भेटायला येतात. जणूं स्वर्ग पृथ्वीजवळ येतो. अनंत तारे जणुं अनन्त आत्मे. त्यांनीं ओथंबून आकाश खालीं नमतें, वांकतें. पृथ्वीला भेटतें. आज अमावास्या. आज बाहेरचा चंद्र नसला तरी जीवनांतील चंद्र षोडश कलांनीं फुलतो. खरें म्हणजे पौर्णिमा वा अमावस्यां अलग नाहींतच. छाया नि प्रकाश एकरुपच आहेत. सारे काळ एक आहेत. सारें विश्व एक आहे. प्रकाशाच्या पोटांतहि अंधार असतो. अंधाराच्या पोटांत प्रकाश असतो. डॉक्टरांच्या दवाखान्यांत विषेंच अधिक असतात. विषें देऊन ते जगवतात. विषाच्या पोटांत, विषाच्या घोटांत अमृत आहे. सारे भेद खोटे, खोटे. मानवांत दानवता आहे, दानवांत मानवता आहे. उभयतांत मधून मधून देवत्त्वहि झळकतें. कोणी त्याज्य नाहीं. सारे वंद्य नि पवित्र. ये अमावास्ये ये. तुझ्या गंभीर प्रकाशांत मला रंगवूं दे.''
''भाऊ दिवा हवा ना ?''
''लहानसा दिवा ठेव येथें लावून''

मध्यरात्र झाली. त्या मंद प्रकाशांत रंगा रंगवित होता. त्याची सारी कला उसळून आली होती, उचंबळून आली होती. तो तन्मय झाला होता. दिक्कालातीत होता.

मधून ताई येऊन पाहून जाई. सुनंदा येऊन पाहून जाई. परंतु रंगाची भावसमाधि कोणाला मोडवत नसे. पहांट झाली. वारा थंडगार येत होता. कोंबडा हि आरवला. आणि तो मिलचा भेसूर भोंगा झाला. कामाला चला, उठा, सर्वांना सांगत होता. परंतु रंगाचें काम समाप्त होत होतें. त्यालाहि संदेश येत होता, दुरुन कोणी तरी हांक मारित होतें. परतीरावरुन साद येत होती. वेणु वाजत होती जणूं. तो मंत्रमुग्ध होता.

सूर्य उगवत होता. मंदमधुर प्रकाश येत होता. डोंगरांच्या माथ्यावर, झाडांच्या शिरावर पसरत होता. रंगानें तेथील गादीवर डोकें ठेवलें. त्याच्या मुखावर मंद प्रभा पसरत होती. ते सोनेरी कोंवळे किरण त्याच्या केंसाना स्पर्श करित होते. प्रभू जणूं अनंत हस्तांनीं त्याला कुरवाळित होता, ऊब देत होता. तो त्याला निजवित होता कीं उठवित होता ?''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel