१५ ऑगस्टची अमर तारीख आली. भारत मुक्त झाला. महात्माजी कोठें आहेत ? ते दु:खी आहेत. भारताचे तुकडे झाले तर मी माझ्या प्राणांनीं सांधीन अशी त्यांची प्रतिज्ञा. दोन देह झाले. तरी त्यांत आत्मा एक असावा म्हणून ते उभे राहिले. परंतु लाखों लोक घरेंदारें सोडून निघाले. हिंदमधून पाकिस्तानांत, पाकिस्तानांतून इकडे ! कत्तली, गोळीबार ! लाखलाख पायीं येत आहेत ! मरत आहेत, लढत आहेत ! जगांत असें झालें नाहीं. पाऊणपाऊण कोटी लोक जा ये करित आहेत. काय हाल, काय विपत्ति ! सारें सोडून निराधार यावयाचें. आकाशाचें छत, पृथ्वीची शय्या ! पाला खायला, पाणी मिळालें तर ! थंडीचा कडाका. ना पांघरुण, ना निवारा !

महात्माजी धीर देत होते. कलकत्त्यांत पुन्हां दंगल. महापुरुष शान्तीचा अमृतकुंभ घेऊन आला. त्यांच्यावरहि दगडफेंक ! भारताच्या, विश्वाच्या हृदयावर ती दगडफेंक होती. ते उपवास करित होते. एका मुसलमानाच्या घरांत ! ते विश्वात्म होते ! कलकत्ता शान्त झालें. बापू दिल्लीला शान्त करायला आहे. म्हणाले येथें शान्त करा. मी पाकिस्तानांत जातों. त्यानीं उपवास आरंभला. त्यांच्यावर बाँब फेकण्यांत आला ! वांचले. म्हणाले ''तो समोर फेकीत असतां तोंडावर हास्य राहिलें असतें का ?''  परंतु प्रभु त्यांना बोलावित होता. ते सारखें म्हणत माझे कोण ऐकतो ? मी एकटा आहें. नका रे मारामारीं करुं ? हें का स्वराज्य ? पाकिस्तान कसेंहि वागो. तुम्ही थोर भूमिकेवरुन वागा. परंतु काळ आला. शुक्रवार ! मुसलमानांचा प्रार्थनेचा दिवस. महात्माजी प्रार्थनेला चालले. जरा उशीर झाला. म्हणाले उशीर करणाराला शिक्षा होते. आणि जलदीनें आले. त्या प्रसन्न मुखानें, प्रभुमय वृत्तीनें ! आणि तो पहा काळपुरुष ! चार गोळ्या आल्या. गोळ्या झाडणार्‍याला बापूंनी प्रणाम केला. तो परमेश्वराचा दूत त्यांनी मानला. हरे राम म्हटलें ! महान् प्रभुमय जीवन !

जगभर अंधार अंधार ! जगाचे हृदय तुटलें, भारताचें नशीब फुटलें ! अरेरे, राष्ट्रपित्याचा वध ! प्रभु त्यांना क्षमा करो. पाप म्हणजे अज्ञान ! दु:खानें वेडें झालेलें मूल आईलाच बोंचकारतें ! देशांतील अनंत आपत्तीनीं वेडा झालेला राष्ट्रपित्यावरच संतापला. परंतु तें वेडें होणें होतें का ? का ती योजना होती ? अनेकांच्या हत्यांची ? प्रभु जाणे. अन्तर्यामी तो.

जगांत तिसर्‍या महायुध्दच्या छाया पसरत आहेत. अशा वेळेस जगाला या शान्तिसिन्धूची पदोपदीं आठवण येईल. तीन दिवस राष्ट्रसंघाचें निशाण खालीं ! जगभर एक विषय, एक विचार, एकच लिखाण ! बापू विश्वपुरुष होते. ते विश्वाचें हृदय होते. गेले. भव्य दिव्य जीवन ! जीवनाला शोभेसें मरण ! यज्ञमय सारें, तेजोमय !

पंडितजी म्हणाले ''अंधार वाटतो. परंतु नाहीं. त्यानीं दिलेला प्रकाश चंद्रसूर्य आहेत तोंवर पुरेल.''  होय पुरेल. जातीयता दूर करा पंडितजी गर्जले. मंत्रिपद सोडून जातीयतेशीं दोन हात करायला येऊं का मैदानांत गर्जले. देशाचें दैन्य संपो. उरलेल्या हिंदीसंघराज्यांतील सारे एकत्र नांदोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel