रंगानें आंथरुणावर आंग टाकलें. ताई स्वयंपाकघरांत पडली. मधूनमधून रंगा उठे. जवळ बसे. असें चाललें. उजाडलें आतां.

''ताई, मी रजा घेऊन येतों चार दिवसांची.''
''येथूनच अर्ज टाक पोस्टांत. नको जाऊंस. मला एकटीला येथें भय वाटत.''
''बरें तर. आणि बर्फ आणायला हवा. तूं आणतेस ? मी त्यांचे स्पंजिंग करतों.''

ताई बर्फ आणायला गेली. रंगानें अमृतरावांचे अंग कढत पाण्यानें पुसून काढलें. त्या रोग्याला किती प्रसन्न वाटलें.

''रंगा, छान केलेंत. सारी घाण धुवून टाकलीत. आतां देवाघरीं मान उंच करुन जाईन. जगांत मान खालीं झाली तरी चालेल परंतु देवासमोर तरी नको. सांगेन त्याला कीं बरबटलों होतों परंतु पुन्हां अंतर्बाह्य शुचि होऊन आलों आहे. ती बघा लिली. हातांत माळा घेऊन माझ्या स्वागतासाठी उभी आहे. तिच्या हातांत तुम्ही काढलेलें एक चित्र आहे. मरतांना तिच्या आईनें चोरुन ठेवलेलें एक चित्र तिच्या हातांत दिलें होतें. तुमची आठवण करी ती. मी सांगे कीं भाऊ खुशाल आहे. त्याला भेटून आलों. लिली, बाबा निर्मळ होऊन, पुण्यवान् होऊन येत आहेत हें तिलाहि कळलें. नाहीं का हो ? नाहींतर हार घेऊन स्वागताला कशी उभी राहाती ? ती बघा. रंगा, दिसते का तुम्हांला ? नाहीं ना ? तुम्ही चित्रकार ना ? एक डोळा मिटून बघा. नाहींतर दोन्ही मिटा. म्हणजे अगदीं छान दिसेल. माझे डोळे मिटत आले म्हणून तर ती दिसूं लागली. जगांतले डोळे मिटूं लागले म्हणजे केवढें विश्व दिसूं लागतें, केवढी अदृश्य दुनिया दिसूं लागते. लिले, येतों हां बाळ.''

तो बोलत होता. ताई बर्फ घेऊन आली. त्यानें डोक्यावर पिशवी धरली. परंतु लक्षण ठीक नव्हतें. नाडीचे ठोके १४० ! तो डॉक्टरांकडे गेला व त्यांना घेऊन आला.

''कठिण आहे'' ते म्हणाले.
त्यानीं एक इंजक्शन दिलें. ते गेले. रंगा बसून होता. त्या धडपडणार्‍या जीवाची वेदना बघत होता. शारीरिक वेदना नि मानसिक.

''रंगा, मुक्त झालों मी. सारे व्रण बुजले, सारी घाण गेली, सारें पाप भस्म झालें.''
तो निपचित पडून होता.
''क्षमा करा दोघें मला.'' सारें शान्त.   
दुपारची बाराची वेळ. अमृतरावांनी राम म्हटला. अमृतस्वरुपी परमात्म्यांत ते मिळून गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel