''ती थोर मुलगी आहे. एकदां मला रस्त्यांत भेटली म्हणाली रंगा तुमचा मित्र ना ? त्याचें पत्र येतें का ? मी म्हटलें आमचें प्रेम पत्रापत्री नाहीं. तें पत्रातीत आहेत. तें शब्दांत मावत नाहीं. कागदावर रंगत नाहीं. तिनें माझ्याकडे करुणेनें पाहिलें नि ती गेली. जहागिरदाराची मुलगी परंतु ऐट नाहीं.''
''माझी आई धुणीं धुणारी. परंतु स्वत:च्या गादीवर तिनें तिला निजविलें. सुटींत घरीं घेऊन गेली होती.''
''ऊठ रंगा. तुम्ही आज जाणार का ?''
''अस्थि घेऊन परवा जाऊं. गंगेंत नेऊन सोडूं. नाशिकच्या गोदावरीच्या प्रवाहांत, कांही मुंबईस समुद्रांत''
''आतां केव्हां भेटशील ?''
''काय सांगूं पंढरी ? आई अकस्मात गेली. या जगांत कशाचा भरवसा नाहीं.''
''असलें दळभद्रें नको बोलूं. आशेनें रहा. भारतासाठीं जग. भारताची कीर्ति तुझ्या कुंचल्यांनी दिगंतांत ने. चल ऊठ. रंगा, ऊठ, डोळे पूस. हंस जरासा. माझें दु:ख आज तुला कळेल. परंतु मी दु:ख उगाळीत नाहीं बसत. हंसतो, खेळतों, पोहतों. तसा तूं हो. चल. मी स्टेशनवर तुला पोंचवायला येईन.'' दोघे मित्र उठले नि गेले.